महाराष्ट्र निवडणूक २०१९: बंद पडलेले ईव्हीएम बदलण्यास लागतोय वेळ; यंत्रणा ठरतेय कुचकामी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 01:10 PM2019-10-21T13:10:14+5:302019-10-21T13:24:47+5:30
सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. काही मतदान केंद्रांवर याचवेळी ईव्हीम सुरू झाले नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या मतदानाला आज सुरूवात झाली असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाला अपयश येत आहे. पावसाने रिपरिप सुरू ठेवलेली असताना मतदार राजाने पाठ फिरविली आहे, मात्र ईव्हीएम बिघाडही तेवढाच कारणीभूत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे आदित्या ठाकरे लढवत असलेल्या वरळीत तर दोन तासांपासून नव्या ईव्हीएमच्या प्रतिक्षेत मतदार ताटकळले आहेत.
सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. काही मतदान केंद्रांवर याचवेळी ईव्हीम सुरू झाले नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तर एका केंद्रावर केवळ एक मत पडले असताना ईव्हीएममध्ये बिघाड झाला आहे. बंद पडलेले मतदान यंत्राची तक्रार करून दुसरे पर्यायी यंत्र मागविण्यामध्ये तास ते दोन तासांचा कालावधी लागत आहे. क्कलकुवा मतदारसंघातील त्रिशुल ता़ धडगाव येथील मतदान केंद्रातील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर तब्बल 5 किमी दगड गोट्यांमधून पायपीट करून मतदान यंत्र पोहोचविण्यात आले आहे.
तर वणी विधानसभा मतदार संघातील नांदेपेरा येथील मतदान केंद्र क्रमांक ५५ वरील मतदान यंत्र दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक बंद झाले. त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला. आता नवीन मशीन लावण्याची प्रक्रिया सुरू असून त्यालाही दीड तास लागतील, असे मतदान केंद्र अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पांढरकवडा(यवतमाळ) येथील नगर परिषद उर्दु शाळा केंद्रावर मतदान यंत्र काम करत नव्हते. त्यामुळे जवळपास अर्धा तास मतदान खोळंबले होते. त्यानंतर यंत्र दुरूस्त करण्यात आले.
अशा प्रकारे मतदान यंत्रे बंद पडत असल्याने मतदानासाठी आलेल्या मतदारांमध्ये संतापाचे वातावरण असून बरेचजण मतदान न करताच माघारी परतत आहेत. तर नांदेपेरा येथील मतदान यंत्र बंद पडल्याने महिला मतदारांनी मतदान केंद्राच्या व्हरंड्यात ठिय्या दिला आहे.