Maharashtra Election 2019: भाजपाची आणखी एक खेळी; शिवसेनेला शह देण्यासाठी दोन उपमुख्यमंत्री?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 06:31 PM2019-10-31T18:31:34+5:302019-10-31T18:38:24+5:30
उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेसाठी सोडायला भाजपा तयार असली, तरी त्यांना त्याचा 'शत प्रतिशत' आनंद किंवा स्वातंत्र्य उपभोगता येईल का, याबद्दल शंकाच वाटतेय.
आमचं 'फिफ्टी-फिफ्टी'चं ठरलंय, असं म्हणणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेत सत्तास्थापनेचं काही ठरतंच नसल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाच्या खात्यांवरून त्यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. दोन्हीकडचे नेते मागे हटायलाच तयार नसल्यानं हा तिढा सुटतच नाहीए. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदं द्यायला भाजपा तयार असल्याची माहिती सूत्रांकडून समजलीय. परंतु, या प्रस्तावातही एक गोम असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे. उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेसाठी सोडायला भाजपा तयार असली, तरी त्यांना त्याचा 'शत प्रतिशत' आनंद किंवा स्वातंत्र्य उपभोगता येणार नाही, यादृष्टीनं ते तजवीज करू शकतात, असे संकेत अंतर्गत सूत्रांनी दिलेत.
कुणी मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घातल्याचं समजू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा
पुन्हा महाराजांच्या नावे मतं मागू नका; अरविंद जगताप यांची 'कड्डक' पोस्ट
मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षं वाटून घेण्याचं ठरलंच नव्हतं, असं सांगून देवेंद्र फडणवीस यांनी, मुख्यमंत्रिपद न सोडण्याची भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे. हे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना खटकलंय. कारण, पदं आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटपाचा निर्णय युती करताना झाला होता. त्याचं पालन व्हावं अशी त्यांची मागणी आहे. परंतु, भाजपा-शिवसेनेच्या संख्याबळातील फरक बघता, भाजपाला फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला मान्यच नाही. शिवसेनेनं उपमुख्यमंत्रिपद घ्यावं आणि ते कुणालाही द्यावं, असं त्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांनाच उपमुख्यमंत्रिपदासाठी पसंती देऊन शिवसेना नेत्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, या खेळीसोबतच आणखी एक खेळी ते करू शकतात आणि ती म्हणजे दोन उपमुख्यमंत्री नेमण्याची! शिवसेनेवर अंकुश ठेवणं हाच त्यामागचा स्वच्छ हेतू आहे.
सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेचे आमदार राज्यपालांच्या भेटीला!
मित्रपक्षाला शत्रूपक्ष मानत नाही, पण...; मुख्यमंत्र्यांचं 'ते' विधान उद्धव ठाकरेंना खटकलं!
शिवसेनेनं उपमुख्यमंत्रिपदावर तडजोड केली, तर पुढे जाऊन हे पद मुख्यमंत्र्यांच्याच समकक्ष आहे, असा आभास निर्माण होऊ शकतो. या पदावर बसलेल्या व्यक्तीने स्वतःला मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीचं समजू नये, यासाठी उपमुख्यमंत्रिपदाचं समसमान वाटप करायची चाल भाजपा खेळू शकते. शिवसेनेच्या उपमुख्यमंत्र्यासोबत भाजपाचाही एक उपमुख्यमंत्री नेमायचा, असा 'न भुतो' घाट घातला जाऊ शकतो, असं जाणकारांना वाटतंय.
जयदत्त क्षीरसागर यांच्या पराभवाने शिवसेनेचा मनसुबा फसला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'या' आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट
विशेष म्हणजे, मंत्रिमंडळाची अशी रचना झाल्यास भाजपाकडून थेट चंद्रकांत पाटील यांना उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकतं. त्यामुळे मंत्रिमंडळातील ज्येष्ठतेत शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर जाईल आणि भाजपाचाच वरचष्मा राहील. अर्थात, हा फॉर्म्युला शिवसेना मान्य करेल का, मुळात त्यांच्यातला तिढा कधी आणि कसा सुटेल, यावर बरंच काही अवलंबून आहे. सध्या तरी दोन्ही पक्ष दबावतंत्र आणि कुरघोडीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत.