Maharashtra Election 2019: तीन तिगाडा, काम बिगाडा... एकनाथ खडसेंचा पत्ता कट होण्याची तीन कारणं!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 10:27 AM2019-10-04T10:27:11+5:302019-10-04T10:41:11+5:30
एकनाथ खडसेंऐवजी त्यांच्या कन्येला उमेदवारी
मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं आज चौथी यादी जाहीर केली. या यादीत ७ उमेदवारांचा समावेश आहे. माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचा पत्ता कापण्यात आल्यानं भाजपाची चौथी यादी चर्चेत आहे. एकनाथ खडसेंऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे खडसेंच्या बंडखोरीची शक्यता जवळपास मावळली आहे. मात्र खडसेंचा पत्ता का कापला, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कथित भोसरी जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे अडचणीत आले. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मंत्रिपद गेल्यानंतर खडसे सतत सरकारवर निशाणा साधत होते. स्वत:च्याच पक्षाच्या सरकारवर केलेली हीच टीका त्यांना भोवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खडसेंना उमेदवारी दिली असती, तर पुन्हा त्यांच्या मंत्रिपदाचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यांच्या मुलीच्या बाबतीत तो प्रश्न येणार नाही. रोहिणी खडसेंना फार तर राज्यमंत्रिपद दिलं जाऊ शकतं.
कधीकाळी खडसे उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचा चेहरा होता. मात्र आता ती जागा गिरीश महाजन यांनी घेतली आहे. खडसे यांची पूर्वी जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर पकड होती. या परिस्थितीत आता बदल झाला आहे. महाजन यांनी अनेक निवडणुकांमध्ये भाजपाला चांगलं यश मिळवून दिलं. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू, संकटमोचक अशी प्रतिमा असलेले महाजन खडसेंच्या खूप पुढे निघून गेले आहेत.
राज्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले खडसेंनी अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाला आव्हान देण्याची भाषा जाहीररित्या केली. खडसेंनी केलेली ही भाषा पक्ष नेतृत्त्वाला खटकली. त्यांना याबद्दल वेळोवेळी समजही देण्यात आली. मात्र तरीही त्यांच्या वागण्या-बोलण्यात कोणताही बदल झाला नाही. खडसेंना उमेदवारी न दिल्यास लेवा पाटील समाज नाराज होऊ शकतो, याची भाजपाच्या वरिष्ठांना कल्पना होती. लेवा पाटील समाजाच्या नाराजीचा फटका भुसावळ, रावेर आणि जळगाव या तीन मतदारसंघात बसू शकत होता. त्यामुळेच त्यांच्या कन्येला उमेदवारी देण्यात आली. यामुळे खडसेंच्या बंडाची शक्यतादेखील टळली.