Maharashtra Election 2019: 'मोदींच्या सभेसाठी झाडं तोडण्यावरून इतका गहजब करण्याचं कारण काय?'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 10:58 PM2019-10-16T22:58:40+5:302019-10-16T23:00:31+5:30
पुण्यात होणाऱ्या मोदींच्या सभेसाठी जवळपास २० झाडांवर कुऱ्हाड
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्या पुण्यात होणाऱ्या सभेसाठी काल झाडं तोडण्यात आली. यावरुन भाजपा सरकारवर जोरदार टीका झाली. त्यावर भाष्य करताना मोदींच्या सभेसाठी झाडं तोडण्यावरून इतका गहजब करण्याचं कारण काय, असा प्रश्न केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उपस्थित केला. याआधीही अनेकदा अशा प्रकारे झाडं कापण्यात आली आहेत. मात्र त्याचवेळी तोडण्यात आलेल्या झाडांपेक्षा अधिक झाडं लावण्यातदेखील आल्याचं जावडेकर म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्या पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा होणार आहे. यासाठी काल सर परशुराम महाविद्यालयाच्या आवारातील झाडं तोडण्यात आली. या वृक्षतोडीवरुन भाजपावर जोरदार टीका झाली. याबद्दल बोलताना जितकी झाडं तोडली जातात, त्यापेक्षा अधिक लावली जातात. तसा वन विभागाचा नियमच आहे, अशा शब्दांमध्ये जावडेकर यांनी सरकारचा बचाव केला.
मोदींच्या सभेसाठी झाडं तोडली गेली, त्यावरुन इतका गहजब करण्याचं कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इतरांच्या सभांसाठीदेखील झाडं तोडली जातात. याआधीच्या पंतप्रधानांच्या सभांसाठीदेखील झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली. त्यावेळी इतकी जागरुकता का नव्हती असा प्रश्न मला पडतो, असं जावडेकर म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी व्यासपीठाच्या जवळ असणारी आणि सुरक्षेला अडथळा आणणारी जवळपास 20 झाडं काल तोडण्यात आली. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता झाडं नव्हे, फांद्या तोडण्यात आल्याचा अजब दावा महापौर मुक्ता टिळक यांनी केला. 'फांद्या तोडण्यासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आली होती. तशी रितसर परवानगी मिळाल्यानंतरच फांद्या तोडण्यात आल्या,' असं महापौर म्हणाल्या.