महाराष्ट्र निवडणूक २०१९: महायुती २०० चा आकडा पार करणार नाही; शिवसेनेच्या मोठ्या नेत्यानं केलं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 02:34 PM2019-10-21T14:34:02+5:302019-10-21T14:35:44+5:30
१३ व्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, सुमारे 9 कोटी मतदार या निवडणुकीत उतरलेल्या 3237 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात आज मतदान होत आहे. अनेक दिग्गज नेते मंडळी मतदानाचा हक्क बजावित आहे. अशातच शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मोठं विधान केले आहे. राज्यात महायुतीला २०० जागा पार करता येणार नाही. असं भाकीत शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलं आहे.
एकीकडे राज्यात महायुतीचं वारं जोरदार असून ही महायुती २२० चा आकडा पार करणार असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेते करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने केलेलं हे विधान महत्वाचं आहे. मनोहर जोशींचे हे विधान भाजपा नेत्यांसाठी घरचा आहेर आहे.
याबाबत बोलताना मनोहर जोशी म्हणाले की, मी अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. कुठल्याही निवडणुकीबाबत निश्चित काही सांगणं अशक्य असतं. त्यामुळे महायुती २०० जागांचा आकडा पार करेल असं मला वाटत नाही असं त्यांनी सांगितले आहे. त्याचसोबत महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर आदित्य ठाकरे असतील, मी पक्षनेतृत्वाविरुद्ध कधीच जात नाही, मी कायमच पक्षाची शिस्त पाळणारा शिवसैनिक आहे त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
१३ व्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, सुमारे 9 कोटी मतदार या निवडणुकीत उतरलेल्या 3237 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे. राज्यातील दिग्गजांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी मुंबईतील अनेक सेलिब्रिटींनी अतिशय उत्साहात मतदान केले.
दरम्यान, राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे. केंद्रीय नेते नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुधीर मुंनगंटीवार, बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, उदयनराजे भोसले, एकनाथ शिंदे, अविनाश जाधव, सत्यजित तांबे, इम्तियाज जलील, राधाकृष्ण विखे-पाटील, गणेश नाईक यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी मतदान केले.