महाराष्ट्र निवडणूक 2019: 'दिल्लीहून स्पष्ट सूचना आल्यात; 'तसं' पाऊल कदापि उचलणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 12:15 PM2019-11-07T12:15:34+5:302019-11-07T12:20:39+5:30
निकालानंतरच्या दोन आठवड्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम
मुंबई: येणाऱ्या काही दिवसात योग्य निर्णय घेऊन भाजपा राज्याला स्थिर सरकार देईल, असा विश्वास भाजपाचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही पावलं उचलू. कोअर कमिटीत त्यावर विस्तृत चर्चा झाली आहे. या संदर्भातल्या घटनात्मक तरतुदींशी चर्चा करण्यासाठी आज राज्यपालांची भेट घेणार आहोत. सत्तास्थापनेचा दावा करायचा की करायचा नाही, याचा निर्णय राज्यपालांच्या निर्णयानंतर घेऊ, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी पत्रकारांना दिली. शिवसेनेकडून काही स्तरावर चर्चा आहे. पण चॅनलच्या माध्यमातून पाहिलं तर वाटतं चर्चा बंद आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं. शिवसेनेसोबतच सरकार स्थापन व्हावं ही भाजपाची इच्छा आहे. अल्पमतातील सरकार कदापि बसवणार नाही. दिल्लीहून तशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीनंच भाजपानं आत्तापर्यंत वाट पाहिली आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.
Sudhir Mungantiwar,BJP on being asked if BJP will stake claim to form a minority government: As of now we have no such plan. #Maharashtrapic.twitter.com/EvpPOQtrbX
— ANI (@ANI) November 7, 2019
सुधीर मुनगंटीवार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील थोड्याच वेळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत. या भेटीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याला मुदतवाढ देण्याची विनंती केली जाणार का, असा प्रश्न मुनगंटीवार यांना विचारण्यात आला. त्यावर तो अधिकार राज्यपाल महोदयांचा आहे. आम्ही त्यांच्याशी सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा करू आणि योग्य तो निर्णय घेऊ, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
सर्वात मोठ्या पक्षाकडून यंत्रणेच्या माध्यमातून आमदारांची फोडाफोड करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर भाष्य करताना कुणीही अशा पद्धतीनं आमदारांचा अवमान करू नये असं मुनगंटीवार म्हणाले. लाखो मतदारांच्या आशीर्वादानं जो निवडून येतो, त्याच्याबद्दल अशा पद्धतीनं अपशब्द काढणं योग्य नाही, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं.
मुख्यमंत्रिपदावर ठाम असलेल्या शिवसेनेनं त्यांचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं समजावं, असं म्हणत मुनगंटीवार यांनी मित्रपक्षाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे देवेंद्रजींना शिवसैनिकच समजतात. देवेंद्रजी शिवसैनिक आहेत, हे उद्धव ठाकरेच म्हणालेत. त्यामुळे देवेंद्रजींच्या रूपानं शिवसैनिकच मुख्यमंत्री होईल, हेच आम्ही सांगतोय. मग अडचण कुठे आहे?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.