महाराष्ट्र निवडणूक 2019: कोण अडून बसलं हे योग्य वेळी कळेलच; मुनगंटीवाराचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 03:03 PM2019-11-06T15:03:36+5:302019-11-06T15:41:09+5:30
भाजपा शिवसेनेमधील सुंदोपसुंदी संपेना; सत्ता वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही
मुंबई: भाजपा, शिवसेनेला सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात अद्याप यश आलेलं नाही. त्यामुळे राज्यातील सत्तेचा तिढा कायम आहे. त्यातच शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत भाजपावर दबाव वाढवला आहे. यावर आज वनमंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं. वाघ कुठलाही असो, कुणाचाही असो, त्याचं संरक्षण होणारच, असं म्हणत मुनगंटीवार यांनी सत्ता वाटपाबद्दल लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला.
शिवसेना, भाजपामध्ये सत्तापदांच्या वाटपावरून दबावाचं राजकारण सुरू असल्यानं महायुतीतला तणाव वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिले. अवकाळी पाऊस आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान या संबंधित विषयावर बैठक असल्यानं शिवसेनेचे नेते बैठकीला उपस्थित राहिल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं.
बैठक संपल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी सत्ता स्थापनेपेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे असल्याचं म्हटलं. त्यावेळी त्यांनी सरकार लवकर स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला. वाघ कुठलाही असो, कुणाचाही असो, त्याचं संरक्षण होणारच, असंदेखील ते म्हणाले. सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटेल आणि गोड बातमी मिळेल. कोण अडून बसलं हे योग्य वेळी कळेल, असं मुनगंटीवार म्हणाले.
चार दिवसांपूर्वीदेखील शिवसेनेबद्दल भाष्य करताना मुनगंटीवार यांनी वाघाचा उल्लेख केला होता. वाघ अग्रलेख लिहून गुरगुरणार असेल, तर मी वनमंत्री आहे. वाघाचं संवर्धन आणि संरक्षण कसं करतात याची मला कल्पना आहे. शिवसेना भाजपची युती टिकण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न केले. त्यामुळे आता वाघ गुरगुरत असला, तरी त्याला सोबत घ्यायचंच आहे, असं मुनगंटीवार म्हणाले होते.