१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 05:22 PM2024-10-20T17:22:12+5:302024-10-20T17:25:24+5:30
काँग्रेसचे नेते दिल्लीत मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि ठाकरे गटाचे नेते यांच्यात बैठकींचा सिलसिला, पडद्यामागून काय चाललंय अशी राजकीय वर्तुळात चर्चा
मुंबई - विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून महाविकास आघाडीत सातत्याने जागावाटपाच्या बैठका सुरू आहेत. परंतु अद्याप जागावाटप जाहीर झालं नाही. त्यातच मविआतील ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचं चित्र पुढे आले आहे. राज्यातील काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत असं विधान संजय राऊतांनी केले होते. तर उद्धव ठाकरेंपेक्षासंजय राऊत हे मोठे नेते असतील असा पलटवार काँग्रेसनं केला. विदर्भातील जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. अशावेळी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेत्यांची तातडीने बैठक बोलावली होती.
जवळपास २ तास ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर संजय राऊत हे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीला गेले. या भेटीला जायच्या आधी संजय राऊतांनी माध्यमांना म्हटलं की, सध्या निवडणुकांचे दिवस आहेत, महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. त्यात काँग्रेसचे नेते दिल्लीत आहेत. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत ज्या काही छोट्या मोठ्या चर्चा आहेत. त्या आज आम्ही पूर्ण करू. यशवंतराव चव्हाण सेंटरला आमची भेट होईल. तिथे आम्ही एकत्रित चर्चा करू. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील जे रखडलेले विषय आहेत ते संपवण्याचा आज प्रयत्न करू. मातोश्रीवरील बैठकीत आम्ही जे काही निर्णय घेतलेत, ते योग्य वेळी लवकरच जाहीर होतील असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय काँग्रेसला सोडून शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार एकत्र लढणार अशी चर्चा सुरू आहे या पत्रकारांच्या प्रश्नावर राऊतांनी सूचक भाष्य केले. माध्यमांनी बनवलेली ही स्टोरी आहे, ती तुमच्यापर्यंतच ठेवली पाहिजे. या स्टोरीला काय कंगोरे फुटतात का पाहा. लोकांना पाहायला मज्जा येते. राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा का होऊ नये? महाविकास आघाडीच्या जवळपास १५ बैठका झाल्या आहेत. आम्ही ३४० तास चर्चा केलीय. पेच सुटेल असं भाष्य संजय राऊतांनी केले आहे.
विदर्भातील १२ जागांवरून संघर्ष
महाविकास आघाडीत विदर्भातील १२ जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यात आज राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, अनिल परब यांनी शरद पवारांची भेट घेतली. काँग्रेस नेते दिल्लीत आहेत. लोकसभेला ठाकरे गटाने रामटेक आणि अमरावती ही जागा काँग्रेसला सोडली होती. त्या बदल्यात विधानसभेला विदर्भात काही जागा मिळतील अशी ठाकरे गटाची अपेक्षा होती. मात्र विदर्भातील १२ जागांवर ज्याठिकाणी विद्यमान मविआचे आमदार नाहीत या जागांवर दोन्ही पक्षातील तिढा वाढलेला आहे.
कोणत्या १२ जागांवरून वाद?
आरमोरी - कृष्णा गजबे, भाजपा आमदार
गडचिरोली - देवराल होली, भाजपा आमदार
गोंदिया - विनोद अग्रवाल, अपक्ष आमदार
भंडारा - नरेंद्र भोंडेकर - अपक्ष आमदार
चिमूर - किर्तीकुमार भांगडिया, भाजपा आमदार
बल्लाळपूर - सुधीर मुनगंटीवार,भाजपा आमदार
चंद्रपूर - किशोर जोरगेवार, अपक्ष आमदार
रामटेक - आशिष जयस्वाल, अपक्ष आमदार
कामठी - टेकचंद सावरकर, भाजपा आमदार
दक्षिण नागपूर - मोहन माते, भाजपा आमदार
अहेरी - धर्मरावबाबा आत्रम, अजित पवार गट आमदार
भद्रावती वरोरा - प्रतिभा धानोरकर ज्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आल्यात.