अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्रात; मुंबई, ठाणे, पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 09:14 AM2024-10-01T09:14:20+5:302024-10-01T09:15:46+5:30

अमित शाह गेल्या महिनाभरात तिसऱ्यांदा महाराष्ट्रात येत असून नेते, पदाधिकाऱ्यांसोबत ते रणनीती आखत आहेत. 

Maharashtra Election 2024- Amit Shah again in Maharashtra today; Constituencies of Mumbai, Thane, Palghar will be reviewed by BJP Leaders | अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्रात; मुंबई, ठाणे, पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा

अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्रात; मुंबई, ठाणे, पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा

मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते मुंबई, ठाणे इथल्या भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गेल्या २ आठवड्यात शाह दुसऱ्यांदा राज्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. भाजपा नेत्यांकडून शाह निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. 

अमित शाह हे २ दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून यावेळी ते कोपरखैरणेतील संघ शाखेलाही भेट देणार आहेत. संघ प्रचारकांसोबत शाह १ तास चर्चा करणार आहेत. मागील आठवड्यात शाह यांनी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील तयारीचा आढावा घेतला. आज ते नवी मुंबईतल्या वाशी इथं कोकण, ठाणे, पालघर विभागातील नेते, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि संघ यांच्यातील समन्वयासाठी विधानसभा संयोजक नेमले गेलेत. त्यामुळे शाह यांच्या या दौऱ्यात ते संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा करतील.

कसा असणार अमित शाह यांचा दौरा?

मंगळवारी दुपारी अमित शाह मुंबईतील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. सायंकाळी ते कोपरखैरणेतील संघ शाखेत जातील. वाशीतील सिडको सभागृहातही शाह यांची बैठक होणार आहे. त्यानंतर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथं पोहचतील. रात्री उशिरा ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील अशी माहिती आहे. याठिकाणी मुक्काम करून दुसऱ्या दिवशीही पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधतील त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास ते दिल्लीला रवाना होतील. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर लगेच महापालिका निवडणुकाही लागणार आहेत. त्यात भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत तयारीचा आढावा शाह यांना देण्यात येईल. सध्या ठाणे, कोकणात भाजपाची काय स्थिती याचाही आढावा शाह यांच्याकडून बैठकीत घेतला जाईल. मुंबईतील लोकसभा निवडणुकीत भाजपाला उत्तर मुंबई वगळता एकाही जागेवर यश मिळालं नाही. ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई या ठिकाणी भाजपाचा पराभव झाला. तर सिंधुदुर्गात नारायण राणे आणि पालघर येथे हेमंत सावरा यांनी भाजपाकडून विजय मिळवला आहे. 
 

Web Title: Maharashtra Election 2024- Amit Shah again in Maharashtra today; Constituencies of Mumbai, Thane, Palghar will be reviewed by BJP Leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.