शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 05:23 PM2024-10-22T17:23:11+5:302024-10-22T17:24:35+5:30

राज्यात मविआ सरकार स्थापनेवेळी जोरगेवारांनी सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्ष आमदार म्हणून त्यांना समर्थन दिले. 

Maharashtra Election 2024 - An independent MLA Kishor Jorgewar supporting CM Eknath Shinde will join Sharad Pawar NCP | शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का

शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का

चंद्रपूर - विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र त्यातच इच्छुक नेते उमेदवारीसाठी पक्षांतरे करत आहेत. चंद्रपूर येथे महायुतीला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे २३ तारखेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. जयंत पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जोरगेवार हे मुंबईत शरद पवारांच्या भेटीला येणार असून चर्चा सकारात्मक झाल्याचं त्यांनी सांगितले आहे.

२०१९ च्या निवडणुकीत चंद्रपूर विधानसभेत किशोर जोरगेवार यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत तब्बल ७५ हजार मताधिक्यांनी जोरगेवार विजयी झाले होते. जोरगेवार यांनी भाजपाचे उमेदवार नाना श्यामकुळे आणि काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता. चंद्रपूर विधानसभेत याआधी १९६२ साली रामचंद्रराव पोटदुखे हे अपक्ष म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर किशोर जोरगेवार हे दुसरे अपक्ष आमदार झाले. मागील निवडणुकीत ते काँग्रेसकडून तिकिटासाठी आग्रही होते. परंतु तिकिट न मिळाल्याने किशोर जोरगेवार हे अपक्ष निवडणुकीत उभे राहिले आणि मोठ्या मताधिक्याने निवडूनही आले. राज्यात मविआ सरकार स्थापनेवेळी जोरगेवारांनी सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्ष आमदार म्हणून त्यांना समर्थन दिले. 

सर्वसामान्य घरातून पुढे आलं नेतृत्व

किशोर जोरगेवार हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले आहेत. अपक्ष म्हणून निवडून आलेले जोरगेवार यांच्या आईचं नुकतेच निधन झालं आहे. अम्मा की दुकान, अम्मा का टिफिन या उपक्रमाने त्या प्रसिद्ध होत्या. गरजूंना दररोज त्या स्वत: तयार करून जेवण पुरवत होत्या. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तू विकून कुटुंबाला हातभार लावला. मुलांना शिकवले, एवढेच नाही तर त्यांचा मुलगा किशोर जोरगेवार हे आमदार झाल्यानंतरही शहरातील गांधी चौकात दुकानात बसून त्यांनी लहान व्यवसाय सुरू ठेवला होता. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची रिघ लागली आहे. कागलमध्ये समरजितसिंह घाटगे, इंदापूरात हर्षवर्धन पाटील, साताऱ्यात संजीवराजे नाईक निंबाळकर, नवी मुंबईत संदीप नाईक, बुलढाण्यात डॉ. राजेंद्र शिंगणे या नेत्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे आणि विदर्भातील चंद्रपूरात आता किशोर जोरगेवार तुतारी चिन्हावर लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 

Web Title: Maharashtra Election 2024 - An independent MLA Kishor Jorgewar supporting CM Eknath Shinde will join Sharad Pawar NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.