"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 06:40 PM2024-10-20T18:40:40+5:302024-10-20T18:42:34+5:30
चिंचवड मतदारसंघात भाजपाने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
चिंचवड - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं त्यांच्या ९९ जणांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत चिंचवड मतदारसंघाच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. अश्विनी जगताप यांच्याऐवजी पक्षाने त्यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे जगताप कुटुंबात कलह निर्माण होणार का अशी चर्चा सुरू होती त्याला खुद्द अश्विनी जगताप यांनी पूर्णविराम दिला आहे.
याबाबत अश्विनी जगताप म्हणाल्या की, मी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानते, पुन्हा एकदा जगताप कुटुंबावर विश्वास दाखवून त्यांनी पक्षाचं तिकीट दिलं आहे. तिकिट दोघांपैकी कुणालाही मिळेल, महायुतीची उमेदवारी कुणालाही मिळाली असती तर आम्ही प्रचार करणार असं आधीच जाहीर केले होते. अंतर्गत कलह कधीच नव्हता. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार होता. तिकीट कुणालाही देतील त्यांचा मी प्रचार करणार असं त्यांनी स्पष्ट केले.
तर सर्वप्रथम मी भाजपा आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो. आज पुन्हा एकदा स्व. लक्ष्मण जगताप, त्यानंतर वहिनी अश्विनी जगताप यांच्यानंतर माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल भाजपा, पिंपरी चिंचवड शहराकडून मनस्वी पक्षाचे आभार मानतो. महायुतीतील सर्व वरिष्ठ नेते त्यांचेही आभार आहेत. पक्षाचं तिकीट मिळेपर्यंत संघर्ष असतो, परंतु एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही स्पर्धा संपते. महायुतीतील सर्व वरिष्ठ नेते, भाजपा नेते एकत्रित बसून जे इच्छुक आहेत त्यांच्या नाराजीवर तोडगा काढतील असा विश्वास उमेदवार शंकर जगताप यांनी व्यक्त केला.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू शंकर जगताप हे निवडणूक लढण्यास तीव्र इच्छुक होते. मात्र, पोटनिवडणुकीत आमदारांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपाने उमेदवारी दिली. त्यामुळे शंकर जगताप यांनी एक पाऊल मागे घेत अश्विनी जगताप यांना संधी दिली. पोटनिवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली अश्विनी जगताप विरुद्ध महाविकास आघाडी कडून नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांनी अशी तिरंगी लढत झाली. मतविभाजनामध्ये जगताप यांचा विजय झाला होता.
महायुतीचे नाना काटे बंडखोरी करणार?
पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव केला होता. मात्र नाना काटे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात असून ते चिंचवड मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक होते. आता या मतदारसंघात भाजपाने शंकर जगताप यांना उमेदवारी दिली त्यामुळे नाना काटे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आगामी काळात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.