उद्धव ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवारांचा ब्रेक?; सांगोला मतदारसंघावरून होणार वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 03:30 PM2024-10-20T15:30:40+5:302024-10-20T15:33:53+5:30
मविआत जागावाटपावरून तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे विदर्भातील जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद टोकाला गेला आहे. त्यात सांगोला मतदारसंघ शेकापला सुटत नसल्याने शेकापने मविआतून बाहेर पडण्याची तयारी केली आहे.
मुंबई - महाविकास आघाडीत जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यातच सांगोला मतदारसंघावरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. या मतदारसंघावर शेकापने दावा सांगितला आहे. तर ठाकरेंनी ही जागा त्यांच्याकडेच ठेवण्याचा आग्रह धरला आहे. त्यातच या मतदारसंघात इच्छुक असलेले दीपक आबा साळुंखे यांना पक्षप्रवेश देऊन त्यांना मशाल चिन्हावर निवडणुकीत उभं करण्याची ठाकरेंची रणनीती आहे. मात्र या रणनीतीला शरद पवारांकडून ब्रेक लावण्याची शक्यता आहे.
सांगोला मतदारसंघ सोडला नाही तर शेकापने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी केली आहे. या मतदारसंघात मागील ५०-६० वर्ष शेकापचे गणपतराव देशमुख यांचं वर्चस्व होतं, मागील निवडणुकीत याठिकाणी शिवसेनेचे शहाजी पाटील निवडून आलेत. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शहाजी पाटील हे शिंदेसेनेत गेलेत. त्यातच महाविकास आघाडीत ही जागा शेकापनं मागितली आहे. आज सकाळी शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत सांगोला मतदारसंघ शेकापला सोडण्याची मागणी करण्यात आली.
बाबासाहेब देशमुख यांच्या भेटीनंतर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मोठं विधान केले. रोहित पवार म्हणाले की, देशमुख कुटुंबाचे कार्य बघता सांगोला असेल किंवा महाराष्ट्रात असेल ते खूप मोठे आहे. त्या कुटुंबाकडे बघताना शरद पवार त्या कुटुंबाला पाठिंबा देतच आहेत. उद्धव ठाकरे पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे. जर सांगोला मतदारसंघात लढत झाली तर महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शेकाप त्या मतदारसंघात जागा लढवेल. त्यांच्याविरोधात एकनाथ शिंदे अशी लढत होईल असं वाटत असल्याचं त्यांनी सांगितले.
दरम्यान, सांगोला मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम करत दीपक आबा साळुंखे हे ठाकरे सेनेत आले. सांगोला मतदारसंघात मशाल पेटवायची असा चंग बांधत ठाकरेंनीही शहाजी पाटलांविरोधात दीपक आबा साळुंखे यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिलेत. या मतदारसंघात विद्यमान आमदार शहाजी पाटील हे महायुतीचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे. परंतु मविआच्या जागावाटपात सांगोला मतदारसंघावरून ठाकरेंच्या शिवसेनेत आणि शेकापमध्ये वाद सुरू आहे. त्यात शरद पवार शेकापला ही जागा सोडावी यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवार ब्रेक लावणार का हे काही दिवसांत स्पष्ट होईल.