Maharashtra Election 2024: दोन ठिकाणी 'राष्ट्रवादी'तच सामना; काका की पुतण्या, कोण ठरणार भारी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 04:49 PM2024-10-29T16:49:43+5:302024-10-29T16:52:35+5:30

Maharashtra Election 2024 Latest Update: महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. पाटणमध्ये दोन्ही शिवसेना आमने-सामने आहेत. तर भाजपची दोन ठिकाणी शरद पवार गटाशी टक्कर आहे. 

Maharashtra Election 2024 fights between sharad pawar's and ajit pawar's candidate in satara | Maharashtra Election 2024: दोन ठिकाणी 'राष्ट्रवादी'तच सामना; काका की पुतण्या, कोण ठरणार भारी? 

Maharashtra Election 2024: दोन ठिकाणी 'राष्ट्रवादी'तच सामना; काका की पुतण्या, कोण ठरणार भारी? 

नितीन काळेल, सातारा 
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News: विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील लढतीचे चित्र झाले स्पष्ट असून, वाई आणि फलटणला दोन्ही राष्ट्रवादीतच सामना रंगणार आहे. यामध्ये काका की पुतण्या भारी ठरणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. तर भाजपची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाशी दोन ठिकाणी काटे की टक्कर होईल. पाटणला दोन सेना समोर येणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचा मतदारसंघ वाटपाचा तिढा जवळपास संपलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लढतीचे चित्रही स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील सर्वच आठ मतदारसंघांतील निवडणूक चुरशीची ठरणार आहे. त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्हीही गट काही ठिकाणी समोरासमोर आहेत.

फलटण विधानसभा : चव्हाण विरुद्ध कांबळे 

फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आमदार दीपक चव्हाण रिंगणात आहेत. अजित पवार गटाकडून सचिन कांबळे दंड थोपटत आहेत. याठिकाणी चव्हाण यांच्या पाठीशी राजेगट तर कांबळे यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर गटाची ताकद मिळणार आहे.

वाई विधानसभा : पाटील विरुद्ध पिसाळ

वाईत राष्ट्रवादी अजित पवार गटातून आमदार मकरंद पाटील आहेत. शरद पवार गटाचा उमेदवारही निश्चित झाला आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे याठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीतच संघर्ष आहे.

भाजपचा दोन मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाशी सामना आहे. माणमध्ये भाजपचे उमेदवार आमदार जयकुमार गोरे आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून शेवटच्या टप्प्यात माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

घोरपडेंसमोर पाटलांचे आव्हान

तसेच भाजपने कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे यांना उतरवले आहे. याठिकाणी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या आमदार बाळासाहेब पाटील यांच्याशी तगडा मुकाबला करावा लागेल. 

भाजपला एकाच ठिकाणी काँग्रेसबरोबर संघर्ष करावा लागेल. कऱ्हाड दक्षिणमध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी भाजपचे अतुल भोसले यांचा पुन्हा सामना होईल. सातारा मतदारसंघात भाजपच्यासमोर उद्धवसेना आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अमित कदम यांच्याशी भिडतील.

पाटणला बंडखोरी; तिरंगी सामना... 

पाटण मतदारसंघात शिंदेसेना आणि उद्धवसेना समोरासमोर येत आहेत. शिंदेसेनेने पालकमंत्री शंभूराज देसाई यांना उमेदवारी दिली आहे. तर उद्धवसेनेकडून हर्षद कदम रिंगणात आहेत. 

याठिकाणी पाटणकर गटानेही दंड थोपटले आहेत. त्यामुळे सत्यजीतसिंह पाटणकर मैदानात उतरत आहेत. यामुळे आघाडीत बंडखोरी होण्याने तिरंगी लढत होणार आहे. 

कोरेगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे आणि शिदेसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्यात हाय व्होल्टेज सामना आहे. सलग दुसऱ्या निवडणुकीत दोघे शिंदे समोरासमोर येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच लढती संघर्षाच्या ठरणार आहेत.

Web Title: Maharashtra Election 2024 fights between sharad pawar's and ajit pawar's candidate in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.