उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 05:50 PM2024-10-23T17:50:00+5:302024-10-23T17:50:56+5:30
ठाकरे गटाकडून यादी जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारांना एबी फॉर्म वाटप सुरू केले आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरायला सुरूवात झाली असून २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ आणि पक्षांतरे पाहायला मिळत आहेत. कोकणात रत्नागिरी येथे शिंदे गटाने उदय सामंत यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात ठाकरेंनी भाजपामधून आलेल्या नेत्याला संधी दिली आहे.
भाजपाचे माजी आमदार बाळा माने यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर बाळा माने यांना ठाकरेंकडून रत्नागिरी मतदारसंघासाठी एबी फॉर्म दिला आहे. मातोश्रीबाहेर येताच माजी आमदार बाळा माने यांनी माध्यमांना मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले की, निवडणूक म्हटलं तर लढाई असणार आहे. मागील ३५ वर्षापैकी ३० वर्ष शिवसेना आणि भाजपाची युती होती. परंतु आज काही राजकीय घडामोडी झाल्याने ही युती नाही. रत्नागिरी आमदार आणि मंत्रिपद असूनही मतदारसंघाचा विकास झाला नाही. सत्तेचा दुरुपयोग करून प्रशासनाला वेठीस धरून त्याठिकाणी कामकाज सुरू आहे. जनतेला परिवर्तन हवे. १९९० सालापासून उद्धव ठाकरे आणि आमचे संबंध आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपाचा विचार घेऊन मी काम करत होतो. आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही पक्षात प्रवेश केला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच १९९९ ते २००४ शिवसेना भाजपा युती होती. तेव्हा अनंत गीते खासदार होते. त्यामुळे आमचे कौटुंबिक संबंध आहेत. भाजपाने माझ्यावर कुठलाही अन्याय केला नाही. माझ्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आहेत. परंतु रत्नागिरीत लोकांना बदल हवा. महायुती म्हणून भाजपाला ही जागा लढवता येत नसल्याने कुणाला निवडणूक लढता येत नाही. त्यातून जनतेची कोंडी झाली आहे. कार्यकर्त्यांशी बोलून हा निर्णय घेतला आहे. बदल हा अटळ आहे. पुन्हा एकदा रत्नागिरीचं नेतृत्व करण्याची संधी जनता मला देईल हा विश्वास आहे असंही बाळा माने यांनी म्हटलं.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत चिपळूण, राजापूर, रत्नागिरी याठिकाणी ५० हजारांचं मताधिक्य भाजपाला कमी मिळालं. महाविकास आघाडीला ४ महिन्यापूर्वी उद्धव ठाकरेंना मताधिक्य होते. याचा अर्थ ही पूर्वपरीक्षा झालेली आहे. विद्यार्थी नापास झालेला आहे त्यामुळे तो कितीही धनाढ्य असला तरी त्यांचा पराभव अटळ आहे असं सांगत बाळा माने यांनी उदय सामंत यांना टोला लगावला आहे.