भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 04:07 PM2024-10-22T16:07:01+5:302024-10-22T16:15:07+5:30

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक इच्छुक या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करत आहेत. धुळ्यातही अशीच एक राजकीय घडामोड घडली आहे. 

Maharashtra Election 2024 - Former Dhule MLA Anil Gote to join Uddhav Thackeray's Shiv Sena | भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले

भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले

धुळे - माजी आमदार अनिल गोटे हे येत्या २ दिवसांत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. गोटे हे धुळ्यातून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. ठाकरे गटाकडून अनिल गोटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लोकसंग्राम पक्ष म्हणून अनिल गोटे यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. मात्र आता ते स्वतंत्र पक्ष चालवण्याऐवजी ठाकरे गटात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.

२४ ऑक्टोबरला मुंबईत अनिल गोटे यांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होईल. गोटे हे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याशी संपर्कात होते. या पक्षप्रवेशाबाबत अनिल गोटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. २४ तारखेला सकाळी मी ठाकरे गटात प्रवेश करतोय. मागच्या १५ दिवसांपूर्वी संजय राऊतांशी चर्चा झाली होती. कार्यकर्त्यांना विचारून हा निर्णय घेतला. आमच्याकडे २ पर्याय होते, एकतर स्वतंत्र लोकसंग्राम म्हणून निवडणूक लढायची किंवा शिवसेना उबाठात प्रवेश करायचा. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निर्णयानंतर २४ तारखेला ठाकरे गटात प्रवेश करतोय असं अनिल गोटे यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी धुळे येथे संजय राऊतांनी दौरा केला होता. धुळे शहर मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेनेकडे असावा असा त्यांचा आग्रह होता. या दौऱ्यावेळी राऊत आणि अनिल गोटे यांच्यात चर्चा झाली. जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर अनिल गोटे मविआचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने पक्षातीलच उमेदवार द्यावा अशी स्थानिक नेत्यांची मागणी होती. या मतदारसंघासाठी माजी आमदार शरद पाटील आणि सुशील महाजन हे इच्छुक होते. परंतु आता अनिल गोटे यांच्या पक्ष प्रवेशामुळे धुळे शहरात कोणाला उमेदवारी मिळणार याची सर्वजण वाट पाहत आहेत.

भाजपा-राष्ट्रवादीनंतर आता ठाकरे गटात

धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपातील गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गोटे हे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत होते. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर काही काळाने जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्यातील मतभेद झाल्यानंतर अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही राजीनामा दिला. त्यानंतर लोकसंग्राम या त्यांच्या पक्षासाठी ते काम करत राहिले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मविआच्या काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनिल गोटे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. 
 

Web Title: Maharashtra Election 2024 - Former Dhule MLA Anil Gote to join Uddhav Thackeray's Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.