विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 08:34 PM2024-10-22T20:34:39+5:302024-10-22T20:36:28+5:30
आरक्षण टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रित सत्तेवर हल्लाबोल करणे आवश्यक आहे. या विचारातून ही आघाडी झाली असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती, महाविकास आघाडी, परिवर्तन महाशक्तीनंतर आता चौथ्या आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन आरक्षणाचं सत्यानाश करण्याचं काम गेल्या ५०-६० वर्ष झालं आहे. मराठा समाज जो प्रस्थापित आहे, सत्ताधीश आहे, धनदांडगा आहे ते ओबीसी आरक्षणात दिवसाढवळ्या घुसत आहेत. केवळ ओबीसी नाही तर दलित आणि इतर समुदायाच्या आरक्षणावर घाला घालण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे. त्यासाठी आरक्षण वाचवायचं असेल तर सर्व आरक्षणवाद्यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे असं सांगत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आरक्षणवादी आघाडीची घोषणा केली आहे.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत या आघाडीची घोषणा करण्यात आली. त्यात प्रकाश शेंडगे म्हणाले की, आरक्षण टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रित सत्तेवर हल्लाबोल करणे आवश्यक आहे. या विचारातून ही आघाडी झाली. आनंदराज आंबेडकर जे बाबासाहेबांच्या विचारांचे, आचारांचे आणि रक्ताचे वारसदार आहेत. तेदेखील या आघाडीत सहभागी आहेत. आरक्षणवादी जेवढे पक्ष आहेत त्या सर्वांनी एकत्रित यावे. ७५ टक्के जनता एकत्र आली तर प्रस्थापितांचा सरपंचही होऊ शकत नाही. रिपब्लिकन सेना, ओबीसी पक्ष यात सहभागी आहेत असं त्यांनी सांगितले.
तर आमची २८८ जागा लढण्याची तयारी आहे. रिपब्लिक सेना, सुरेश मानेंची बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, वामन मेश्राम आणि चंद्रशेखर आझाद यांच्याशीही चर्चा सुरू आहे. तेदेखील या आघाडीत सहभागी होतील. अनेक सामाजिक संघटना यात सहभागी होणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा हा प्रयोग होतो, मंडल आयोगानंतर यूपी, बिहारमध्ये हा प्रयोग झाला आणि ओबीसींनी हातात सत्ता घेतली. आज महाराष्ट्रात आम्ही हा प्रयत्न करतोय. मराठा आरक्षणामुळे ओबीसी जागरुक झाला आहे. ओबीसी, दलित यांच्या हातात राज्याची सत्ता आणायची. आरक्षणवादी घटकांना सत्तेपासून वंचित ठेवले, त्यांना सत्तेत आणायचं आहे असं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं.
प्रकाश आंबेडकरांनाही सोबत घेण्याची तयारी
दरम्यान, जे जे आरक्षणवादी आहेत, त्यांना सोबत घेण्याची आमची तयारी आहे. आम्हाला कुणाचीही अडचण नाही. आज ओबीसींमध्ये अस्थिरता आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे, परंतु ओबीसीत नको तर वेगळे आरक्षण घ्यावे. आज आरक्षण धोक्यात आहे असं सांगत आनंदराज आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांनाही सोबत येण्याच्या प्रश्नावर भाष्य केले.