भाजपाच्या यादीत किती महिलांना स्थान?; खासदार अशोक चव्हाणांच्या मुलीला मिळाली संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 04:08 PM2024-10-20T16:08:06+5:302024-10-20T16:08:43+5:30
भाजपानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली असून त्यात अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत १३ महिलांना स्थान देण्यात आलं आहे. त्यात खासदार अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांनाही भाजपाने भोकर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
कोणत्या मतदारसंघात महिला उमेदवारांना संधी?
चिखली - श्वेता विद्याधर महाले
भोकर -श्रीजया अशोक चव्हाण
जिंतूर - मेघना बोर्डिकर
फुलंबरी - अनुराधाताई अतुल चव्हाण
नाशिक पश्चिम - सीमाताई महेश हिरे
कल्याण पूर्व - सुलभा गणपत गायकवाड
बेलापूर - मंदा विजय म्हात्रे
दहिसर - मनीषा अशोक चौधरी
गोरेगाव - विद्या जयप्रकाश ठाकूर
पर्वती - माधुरी सतीश मिसाळ
शेवगाव - मोनिका राजीव राजळे
श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते
कैज - नमिता मुंदडा
कल्याण पूर्वेत महायुतीत वाद
कल्याण पूर्व मतदारसंघात विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड हे इच्छुक होते. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील वाद राज्यभरात गाजला होता. आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड हे सध्या जेलमध्ये आहेत. मात्र त्यांच्या पत्नी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच महेश गायकवाड यांनी भाजपाने या मतदारसंघात गणपत गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबातील कुणालाही उमेदवारी दिली तर मी अपक्ष निवडणूक लढवणार असा इशारा दिला होता. त्यामुळे आता या मतदारसंघात महायुतीत वाद पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, चिंचवड मतदारसंघातील विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचा पत्ता कट झाला आहे. त्यांच्याऐवजी त्यांचे दीर शंकर जगताप यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. चिंचवड मतदारसंघात लक्ष्मण जगताप हे भाजपाचे आमदार होते, मात्र त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. परंतु आता या मतदारसंघात शंकर जगताप निवडणूक लढवण्यास इच्छुक होते.