मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 05:57 PM2024-10-22T17:57:14+5:302024-10-22T17:59:04+5:30
मविआत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यात इतर छोटे घटक पक्ष त्यांना किती जागा मिळतील हे स्पष्ट नसल्याने शेकापने सांगोल्यासह इतर ठिकाणी उमेदवार जाहीर केलेत.
रायगड - विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली तरीही महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झाले नाही. विदर्भातील काही जागांवरून अद्याप ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. त्यातच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने ५ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडली का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
मागील अनेक दिवसांपासून मविआ नेत्यांच्या सातत्याने बैठका सुरू आहेत. परंतु जागावाटपात तिन्ही पक्षांचा दावा असलेल्या जागांवर वाद होत आहेत. आज शेतकरी कामगार पक्षाने अलिबाग, पेण, उरण, पनवेल आणि सांगोला येथील उमेदवार जाहीर केले. त्यात अलिबागमधून चित्रलेखा पाटील, पेणमधून अतुल म्हात्रे, उरण प्रीतम म्हात्रे, पनवेल बाळाराम पाटील, सांगोला बाबासाहेब देशमुख यांना तिकीट देण्यात आले आहे. आम्ही महाविकास आघाडीत आहोत, दिलेला शब्द बदललेला नाही असं विधानही उमेदवारांची घोषणा करताना जयंत पाटील यांनी केले आहे. अलिबाग येथील शेतकरी भवनात आज शेकापची बैठक झाली. त्यात ५ उमेदवारांचा निर्णय घेण्यात आला.
सांगोला जागेवरून वाद
महाविकास आघाडीत सांगोल्यासह काही जागांवर शेतकरी कामगार पक्षाने दावा केला होता. मात्र सांगोला येथे विद्यमान आमदार शिवसेनेचा असल्याने ती जागा ठाकरे गटाला दिली. याठिकाणचे आमदार शहाजी पाटील हे शिंदेसोबत गेले असले तरी ही जागा सोडण्यास ठाकरे गटाने नकार दिला. इतकेच नाही तर या जागेवर इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दीपक आबा साळुंखे यांना ठाकरेंनी त्यांच्या पक्षात प्रवेश दिला. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे रिंगणात असतील असं बोललं जाते. त्यामुळे नाराज शेतकरी कामगार पक्षाने शरद पवारांची भेट घेतली. परंतु कुठलाही सकारात्मक तोडगा निघत नसल्याने आज अलिबाग येथे शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली. यात शेकापने सांगोलासह इतर ४ ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत.