Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 11:36 AM2024-11-13T11:36:45+5:302024-11-13T11:39:31+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप अशीच थेट लढत आहे. भाजप-काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
राजेश भोजेकर, चंद्रपूर
Maharashtra Election 2024: गेल्यावेळी बरोबरीत सुटलेला सामना आणि लोकसभा निवडणुकीतील विजयाच्या बळावर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रभाव काँग्रेस कायम ठेवणार की, भाजप नव्या दमाने उफाळून येणार, हा विधानसभा निवडणुकीतील औत्सुक्याचा विषय आहे. भाजपचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात कोण वरचढ ठरतो, हे निकालातूनच स्पष्ट होईल.
बह्मपुरी व चिमूरमध्ये थेट लढतीचे चित्र आहे. राजुऱ्यात स्पष्टपणे तिरंगी, तर चंद्रपूरमध्ये थेट लढतीत भाजप बंडखोरांची एन्ट्रीने आणि बल्लारपुरात काँग्रेस बंडखोरांमुळे लढतींना किंचित तिरंगी स्वरूप धारण केले आहे.
वरोरा विधानसभा निवडणूक
वरोरा मतदारसंघात काँग्रेस, भाजपसह अन्य तीन उमेदवारांमध्ये चढाओढ आहे. राजुऱ्यात काँग्रेस आमदार सुभाष धोटे, स्वभापचे अॅड. वामनराव चटप व भाजपचे देवराव भोंगळे यांच्यात लढत असून गोंगपाचे गजानन जुमनाके यांच्यामुळे लढतीत चुरस आली आहे.
बल्लारपुरात भाजपचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे संतोषसिंह रावत यांच्या लढतीत डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी रंगत आणली आहे.
चंद्रपुरात बंडखोर उमेदवारावर लक्ष
चंद्रपूरात भाजपचे किशोर जोरगेवार व काँग्रेसचे प्रवीण पडवेकर यांच्या लढतीत भाजपचे बंडखोर ब्रिजभूषण पाझारे यांच्याकडेही लक्ष आहे.
वरोऱ्यात अपक्षांनी प्रमुख उमेदवारांचे गणित बिघडवले आहे. चिमूरमध्ये भाजपचे बंटी भांगडिया व काँग्रेसचे सतीश वारजूकर तर ब्रह्मपुरीत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार व भाजपचे कृष्ष्णलाल सहारे यांच्यात सरळ लढत आहे.
उमेदवारांची कार्यकर्त्यांवरच भिस्त
मतदानासाठी उरलेले दिवस मोजून प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आता प्रचारात गुंतले आहे. सकाळी सात-आठ वाजेपासून पायाला भिंगरी लावल्यासारखे प्रचार करीत आहेत. एकाच टप्प्यात निवडणूका होत असल्यामुळे राज्यातील नेत्यांच्या सभाही कमीच आहे. यामध्ये उमेदवारांची अधिक भिस्त कार्यकर्त्यांवर आहे.
निवडणुकीत महत्त्वाचे फॅक्टर
महायुतीकडून राज्यात अडीच वर्षाच्या काळातील विकासकामे जनतेला सांगत असून महाविकास आघाडीतील नेते विकासाला कसा विरोध करतात हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीकडूनमहायुतीचे सरकार कसे खोटारडे आहे हे पटवून देत आहे.
यासोबतच शेतकरी, रस्ते, वीज, पिण्याचे पाणी या प्रश्नांसह रोजगाराचे मुद्दे मांडत आहेत तसेच लाडकी बहीण योजनेबाबत दोन्ही कडून प्रचारात महत्वाचा मुद्दा मांडला जात आहे.