जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 04:20 PM2024-10-23T16:20:42+5:302024-10-23T16:30:33+5:30
उद्धव ठाकरे यांनी अमित ठाकरेंविरोधात माहिम मतदारसंघात उमेदवार उतरवला असून माहिममध्ये पुन्हा भगवा फडकवा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे.
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत माहिम मतदारसंघाची लढत चुरसीची होणार आहे. कारण याठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महायुतीकडून सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनीही या मतदारसंघात महेश सावंत यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे माहिम मतदारसंघात तिरंगी लढत होईल. एका सर्वसामान्य व्यक्तीला उद्धव ठाकरेंनी न्याय दिला आहे. या मतदारसंघात जनतेच्या मनातला सामान्य आमदार भेटेल अशी पहिली प्रतिक्रिया ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी दिली आहे.
माध्यमांशी महेश सावंत यांनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आजपर्यंत आम्ही जनतेची सेवा केली आहे. कुठल्याही कामासाठी रात्री अपरात्री धावून गेलो आहे. जनतेच्या मनातला सामान्य आमदार त्यांना भेटेल. माझ्यासमोर कोण उभे आहे हे मी बघत नाही. आम्ही काम करत असतो, जनतेची सेवा करतो. मी कुणावरही वैयक्तिक टीका करणार नाही. कोण काम करणार आणि कोण घरी बसणार हे जनतेला माहिती आहे. जनता २० तारखेला मतदान करतील त्यानंतर २३ तारखेला आमचा जल्लोष बघा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच ठाकरे घराण्यातील उमेदवार असल्याने काही टेन्शन नाही, उद्धव ठाकरे निवांत आहेत. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा काही फरक पडणार नाही. माहिम मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवणार आहे. कितीही आव्हान असेल तर जनतेला रात्री मदतीला धावून येणारा उमेदवार त्यांना भेटला आहे. बाळासाहेबांची शिवसेना जशी काम करत होती तसेच काम होणार आहे. या मतदारसंघात १०० टक्के विजय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा होणार आहे अशी खात्री असल्याचं महेश सावंत यांनी म्हटलं.
दरम्यान, विजय आमचाच होणार असून २३ नोव्हेंबरला अशाचप्रकारे जल्लोषात तुम्हाला मुलाखत देणार. पक्षप्रमुखांनी सर्व इच्छुकांना बसवलं, सर्वांनी एकदिलाने काम करा. माहिम मतदारसंघात पुन्हा भगवा फडकलाच पाहिजे. सत्ता आपलीच आहे. जे इच्छुक आहेत त्यांना आम्ही न्याय देऊ असं उद्धव ठाकरेंनी कानमंत्र दिल्याचेही महेश सावंत यांनी सांगितले.