Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 04:55 PM2024-11-01T16:55:36+5:302024-11-01T16:59:08+5:30

Malegaon Outer Assembly Election Explain in Detail: विधानसभा निवडणुकीत माळेगाव बाह्य मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेचा सामना होणार आहे. 

Maharashtra Election 2024 malegaon outer election explained in marathi Dada Bhuse vs Advaya Hire The existence of the divided Shiv Sena is at stake | Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला

Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला

धनंजय वाखारे, नाशिक 
Malegaon Outer Assembly Election Explain in Marathi : मालेगाव बाह्य मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार मंत्री दादा भुसे आणि दीर्घकाळापासून राजकारणात ठसा उमटविणाऱ्या हिरे घराण्यातील चौथ्या पिढीचे सदस्य व उद्धवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रमोद (बंडू) बच्छाव यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे मत विभागणी होऊन त्याचा फायदा नेमका कुणाला होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मालेगाव बाह्य मतदारसंघाचे सलग चार टर्मपासून दादा भुसे प्रतिनिधीत्व करत आहेत. शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या भुसे आता सलग पाचव्यांदा विधानसभेत जाण्यास इच्छुक आहेत. त्यांना हिरे घराण्यातून आव्हान देण्यात आले आहे. माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांचे नातू व माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे सुपुत्र अद्वय हिरे उद्धवसेनेकडून रिंगणात उतरले आहेत.

लोकसभेला भाजप उमेदवाराला मताधिक्य 

मालेगाव बाह्य हा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो. लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवारी करणारे भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांना या मतदारसं- घातून ५५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. डॉ. भामरे यांना लगतच्या मालेगाव मध्य मतदारसंघातून अतिशय अल्प मतदान झाले. परंतु, भुसे यांनी आपल्या बाह्य मतदारसंघातून मताधिक्य देऊनही भाजपमध्ये मात्र दोन गटांत यावरून मतभेद आहेत.

दशकभरानतर हिरे घराणे मैदानात 

मतदारसंघात भाऊसाहेब हिरेंपासून ते प्रशांत हिरे यांच्यापर्यंत हिरे घराण्याचे सत्तेत स्थान राहिले आहे. २००९ मध्ये दादा भुसे यांनी प्रशांत हिरे यांचा पराभव केल्यानंतर २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत हिरे घराणे मतदारसंघातून दूर गेले. आता दशकभरानंतर पुन्हा एकदा अद्वय हिरे यांच्या माध्यमातून भुसे यांना आव्हान उभे करण्यात आले आहे. ही लढत उद्धवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे 

मालेगाव जिल्हा निर्मितीचा मुद्दा गेल्या चार दशकांपासून गाजतो आहे. मतदारसंघाला मंत्रिपद लाभूनही हा प्रश्न सुटू शकला नसल्याचा मुद्दा निवडणूक प्रचारात प्राधान्यक्रमावर असेल. 

मांजरपाडा प्रकल्पासह सिंचनाच्या मुद्द्याबरोबरच अद्वय हिरे यांच्यावरील जिल्हा बँकप्रकरणी झालेली कारवाईही कळीचा मुद्दा ठरू शकते.

Web Title: Maharashtra Election 2024 malegaon outer election explained in marathi Dada Bhuse vs Advaya Hire The existence of the divided Shiv Sena is at stake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.