Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 06:42 AM2024-11-19T06:42:38+5:302024-11-19T06:43:36+5:30
राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण ८ हजार ६७८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ८ हजार ६६८ तक्रारी आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या आचारसंहितेच्या कालावधीत आतापर्यंत ६६० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत ही जप्ती करण्यात आली आहे. २०१९ मध्ये पूर्ण निवडणूक काळात १२२ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.
दरम्यान, राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण ८ हजार ६७८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ८ हजार ६६८ तक्रारी आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.
नेमके काय केले जप्त?
- १५३ कोटी रुपयांची रोख रक्कम
- ६८ कोटी ६३ लाख रुपये किमतीची ६८ लाख ५१ हजार ३६४ लिटर दारू
- ७२ कोटी रुपयांचे १ कोटी १ लाख ४२ हजार ४५२ ग्रॅम अमली पदार्थ
- २८२ कोटी ४९ लाख किमतीचे १ कोटी ६४ लाख ७२ हजार ५९६ ग्रॅम मौल्यवान धातू
- ३ कोटी ७८ लाख रुपयांच्या मोफत वाटपासाठी आणलेल्या ५७ हजार ९४९ वस्तू
- इतर साहित्यामध्ये १३ लाख ७३ हजार ७७५ इतक्या ७५ कोटी ६० लाखांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या.
आणखी कुठे कारवाई?
अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील निंबा फाटा येथे कार्यान्वित स्थिर सर्वेक्षण पथकाने सोमवारी कारमधून एक लाख रुपयांची रोकड जप्त केली.
सोलापूर येथे मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल, ८० हजारांची रोख रक्कम जप्त.