नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 08:43 PM2024-10-20T20:43:41+5:302024-10-20T20:45:11+5:30
२ दिवसांपूर्वी भाजपा पदाधिकारी सीमा हिरे यांच्याविरोधात एकत्र आले होते, मात्र आज पहिल्या यादीत भाजपाने सीमा हिरेंनाच पुन्हा तिकिट दिल्यानं नाराजी
नाशिक - भाजपाच्या पहिल्या यादीत नाशिक पश्चिम मतदारसंघात सीमा हिरे यांनाच पक्षाने पुन्हा तिकिट दिले आहे. मात्र हिरे यांच्या उमेदवारीला पक्षातूनच नाराजीचा सूर उमटत आहे. गेल्या १० वर्षापासून सीमा हिरे यांनी मतदारसंघात काय ठोस काम केले नाही. या मतदारसंघातील लोक आणि ९० टक्के पक्षाचे पदाधिकारी हिरे यांच्यावर नाराज आहेत. कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही. बेरोजगारांना रोजगार दिला नाही अशा तक्रारी त्यांच्याबद्दल आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक मतदारसंघात तयारी करत होते. मी निवडणूक लढवणार, थांबणार नाही असा इशारा भाजपा नेते दिनकर पाटील यांनी दिला आहे.
भाजपा नेते दिनकर पाटील म्हणाले की, मी ११ वर्ष भाजपात आहे, पक्षाने मला चार वेळा थांबायला सांगितले तेव्हा मी थांबलो. पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. स्थायी समिती दिली नाही, महापौरपद दिले नाही. लोकसभेला तिकिट नाही आणि आता विधानसभेला सीमा हिरेंविरोधात इतकी नाराजी असतानाही पक्षाने पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली. पक्षाने माझ्यावर खूप मोठा अन्याय केला आहे. याबाबत माझ्या समर्थक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून पुढील २ दिवसांत आम्ही निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितले.
सीमा हिरेंच्या नावाला भाजपा पदाधिकाऱ्यांचा विरोध
नाशिक पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार सीमा हिरे आहेत. मात्र त्यांना पक्षातच पदाधिकाऱ्यांचा विरोध होत आहे. २ दिवसांपूर्वी भाजपा पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी भेट घेतली होती. नाशिक पश्चिम मतदारसंघात उमेदवार बदलून द्यावा, त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष आहे. मतदारसंघात नाराजीचा सूर आहे. जर उमेदवार निवडून येणार नसेल तर आपल्या पक्षाचं नुकसान होईल असं सांगत भाजपा पदाधिकाऱ्यांनी सीमा हिरे यांना विरोध केला होता.
भाजपाच्या पहिल्या यादीत १३ महिलांना संधी
चिखली - श्वेता विद्याधर महाले
भोकर -श्रीजया अशोक चव्हाण
जिंतूर - मेघना बोर्डिकर
फुलंबरी - अनुराधाताई अतुल चव्हाण
नाशिक पश्चिम - सीमाताई महेश हिरे
कल्याण पूर्व - सुलभा गणपत गायकवाड
बेलापूर - मंदा विजय म्हात्रे
दहिसर - मनीषा अशोक चौधरी
गोरेगाव - विद्या जयप्रकाश ठाकूर
पर्वती - माधुरी सतीश मिसाळ
शेवगाव - मोनिका राजीव राजळे
श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते
कैज - नमिता मुंदडा