"महाराष्ट्रात अशांनाच मतदान करा जे..."; मुख्यमत्री शिंदे यांचं नाव घेत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 06:38 PM2024-11-11T18:38:37+5:302024-11-11T18:39:41+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : ...यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, "उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या विश्वासघाताचे आम्हाला दु:ख आहे. ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय आमचे दु:ख दूर होणार नाही," असे विधानही त्यांनी केले होते.
आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या निवडणुकांवरही भाष्य केले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात हिंदूंच्या हितासाठी काम करणाऱ्यांनाच मत द्यायला हवे. यावेळी, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य करत आहेत, त्यांनी गायीला 'राजमाते'चा दर्जा दिला आहे, असेही म्हटले आहे.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी यापूर्वीही एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, "उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या विश्वासघाताचे आम्हाला दु:ख आहे. ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय आमचे दु:ख दूर होणार नाही," असे विधानही त्यांनी केले होते.
काम करणाऱ्यांना समर्थन -
उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका कार्यक्रमातही दिसले आणि त्यांचे कौतुकही केले होते. नुकतेच एका हिंदी वृत्तवाहिनीसोबत बोलताना, महाराष्ट्र हे देशातील असे पहिले राज्य आहे, ज्याने गायीला राज्य मातेचा दर्जा दिला. यामुळे विद्यमान शिंदे सरकारला विधानसभा निवडणुकीत विजयासाठी आशीर्वाद देत आहोत. याच वेळी, त्यांनी असेही स्पष्ट केले होते की, ज्या पक्षाकडून गायीच्या संरक्षणाचा विचार केला जाईल, त्यांना आपण समर्थन देणार. आपण कुण्या एखाद्या विशिष्ट पक्षाचे समर्थन करत नाही. तर ज्या पक्षाचे कार्य श्रेष्ठ असते, त्यांनाच समर्थन देतो.
निवडणुकीपूर्वी, एक मोठा निर्णय घेत सप्टेंबर महिन्यात एकनाथ शिंदे सरकारने गायीला राज्य मातेचा दर्जा देण्यासंदर्भात निर्णय घेतला होता.