निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतीच्या २८ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 10:05 AM2024-10-11T10:05:54+5:302024-10-11T10:49:32+5:30
जिल्ह्यातील २८ पदाधिकाऱ्यांसह सामूहिक राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे सोपविणार असल्याची माहिती राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
अमरावती - ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमरावती येथे शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी जिल्हाध्यक्षासह २८ पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देत बंडखोरीचे संकेत दिलेत. लोकसभेत पक्षविरोधी काम करणाऱ्या नेत्यांच्या सांगण्यावरूनच माझ्याकडून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी काढल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदीप राऊत यांनी केला आहे. जिल्ह्यातील २८ पदाधिकाऱ्यांसह सामूहिक राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे सोपविणार असल्याची माहिती राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ९ ऑक्टोबरला प्रदीप राऊत यांच्याकडून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी काढून प्रदेश संघटन सचिव पदावर नियुक्ती केली आहे. परंतु हा बदल करताना कोणतीही पूर्व सूचना पक्ष नेत्यांनी दिली नसल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. पाच महिन्यापूर्वीच त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली होती. या कार्यकाळात त्यांनी पक्ष वाढीसाठी काम केले. परंतु स्थानिक नेत्यांनी त्यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रारी केल्याने त्यांना पदावरून काढल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लोकसभेत याच नेत्यांनी नवनीत राणा यांच्याकडून पैसे घेऊन त्यांचे काम केले होते. त्यासंदर्भातील पुरावेदेखील वरिष्ठांना दिले आहेत. अचानक केलेल्या कारवाईमुळे प्रदेश संघटकपदाचा राजीनामा देत असून जिल्ह्यातील इतरही २८ पदाधिकारी यांनी राजीनामे दिले आहेत.
प्रदीप राऊत यांच्याकडे अमरावती आणि वर्ध लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी होती. या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार निवडून आलेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रदीप राऊत यांची जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. कुठलीही पूर्वकल्पना न देता अशाप्रकारे पद काढून घेतल्याने प्रदीप राऊत नाराज झालेत. पक्षाने घेतलेल्या या निर्णयामागे माजी जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, विधानसभा माजी उपाध्यक्ष शरद तसरे आणि प्रकाश बोंडे जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रदीप राऊत यांनी पक्षाकडून सोपवण्यात आलेल्या प्रदेश संघटन सचिवपदाचाही राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष किशोर बर्डे, सामाजिक न्याय विभागाचे सुनील किर्तनकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.
शरद पवार पक्षात जोरदार इनकमिंग
एकीकडे शरद पवार गटातील पदाधिकारी सामुहिक राजीनामे देत असले तरी राज्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठी नेत्यांची रिघ लागलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपासून याची सुरुवात झाली. मोहिते पाटील पुन्हा पवारांकडे गेल्यानंतर आता कोल्हापूरातील समरजितसिंह घाटगे, इंदापूरातील हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. येत्या १४ ऑक्टोबरला फलटणमधील रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण हेदेखील शरद पवारांसोबत जाण्याची चर्चा आहे.