Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 07:49 PM2024-10-27T19:49:04+5:302024-10-27T19:51:52+5:30
Manoj Jarange patil Maharashtra Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टर निर्णायक ठरला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून उमेदवार भेटी घेताना दिसत आहे.
Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील ४६ जागांचा निकाल काय लागेल, याबद्दल सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर खूप निर्णायक ठरला होता. छत्रपती संभाजीनगरची जागा वगळता इतर ७ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून मनोज जरांगेंच्या भेटी वाढल्या आहेत.
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने संजय शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात मराठा फॅक्टर महत्त्वाचा आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांनी आज मनोज जरांगेंची भेट घेतली.
आज अंतरवाली सराटी येथे श्री.मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध सामाजिक,राजकीय अश्या विविध विषयावर चर्चा केली.#eknathshinde#cmomaharashtra#sanjayshirsat#chairman#cidco#maharashtra#manojjarangepatilpic.twitter.com/h0wEvKMIvX
— Sanjay Shirsat (@SanjayShirsat77) October 27, 2024
संदीप क्षीरसागर मनोज जरांगे भेट
बीड विधानसभा मतदारसंघातून संदीप क्षीरसागर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी रविवारी (२७ ऑक्टोबर) मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली.
आज क्रांतिकारी नेतृत्व, मा.श्री.मनोजदादा जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/iSrLJSgtOd
— Sandeep Kshirsagar (@SRK_Speaks_) October 27, 2024
महायुती-महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भेटी
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते मनोज जरांगे यांच्या भेटी घेत आहेत. मनोज जरांगे यांनी काही मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी उमेदवार दिला जाणार नाही, तिथे कोणत्या उमेदवाराला पाडायचं हे ठरवून अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे.
मनोज जरांगे यांचा मराठवाड्यात विधानसभा निवडणुकीत प्रभाव दिसेल, असे राजकीय नेते, राजकीय विश्लेषक सांगत आहेत. मराठवाड्यात विधानसभेच्या ४६ जागा आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी मराठा उमेदवार, ओबीसी आणि इतर समुदायातील उमेदवार देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसला होता. विशेषतः भाजपचं जास्त नुकसान झालं होतं. भाजपने जालना, बीड, नांदेड, लातूर हे मतदारसंघ गमावले. तर शिंदेंच्या शिवसेनेने छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकली होती.
परभणीची जागा महायुतीने रासपचे महादेव जानकर यांना दिली होती. पण, त्यांचा पराभव झाला. धाराशिवची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गमवावी लागली.