"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 12:46 PM2024-11-08T12:46:20+5:302024-11-08T12:47:54+5:30

Sharad Pawar News: कोणीतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका लढायच्या. कुठे तरी थांबलं पाहिजे, असे विधान शरद पवारांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या. 

Maharashtra Election 2024 Sharad Pawar has made an important statement about retiring from politics | "...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान

"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान

Sharad Pawar News In Marathi: शरद पवारांनी बारामतीत निवडणूक न लढण्याबद्दल विधान केले होते. त्यांच्या विधानानंतर निवृत्तिबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या. याबद्दल एका मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. या विधानामागची भूमिका स्पष्ट करताना शरद पवारांनी त्यांच्या राजकीय निवृत्तीबद्दल भाष्य केले. शरद पवार यांनी न्यूज१८ लोकमला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.  

'तुम्ही मध्यंतरी म्हटलात की तुम्हाला निवडणुकीच्या राजकारणात रस नाही. तुम्ही निवृत्तीचे संकेत दिले असे म्हटले गेले', असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला.  त्याला शरद पवारांनी उत्तर दिले. 

"मी तसं नाही म्हटलं. मी असं म्हटलं... मी सांगत हे होतो की, माझ्या कुटुंबाचा विषय होता तो. मी २५-३० वर्षे, माझ्यानंतर २५-३० आणि त्यानंतर पुढची २५-३० वर्षासाठी एक पिढी तयार करावी, ही माझी त्यातली इच्छा होती", असे शरद पवार म्हणाले. 

निवडणुकीच्या प्रक्रियेत थांबायचं ठरवलं -शरद पवार

"आता माझ्या पुरता बोलत असताना मी हे सांगितलं की, मी आता निवडणूक लढणार नाही. हे आजच नाही, २०१४ पासून मी निवडणूक लढलो नाही. मी राज्यसभेवर गेलो. निवडणुकीला स्वतः उभं राहिलो नाही. माझ्या मतदारसंघात सुप्रिया उभी राहिली चार वेळा. म्हणजे थेट निवडणुकीच्या प्रक्रियेत मी थांबायचं ठरवलं आहे", असे शरद पवार म्हणाले.  

"जोपर्यंत शक्य, तोपर्यंत राजकारण, समाजकारणापासून बाजूला राहणार नाही"

"मी आता हा विचार करतोय की, माझी दोन वर्षांनी टर्म संपेल. त्यावेळी विचार करूया की, जायचं की नाही. याचा अर्थ ज्या पद्धतीने मांडलं गेलं की, हे असे असे संकेत आहेत. प्रश्न असा आहे की, निवडणुका लढणं वेगळं आणि राजकारणात सातत्य ठेवणं वेगळं. मी राजकारण आणि समाजकारण यापासून बाजूला राहणार नाही. ते मी करतच राहीन जोपर्यंत मला शक्य आहे, तोपर्यंत", अशी भूमिका मांडत पवारांनी राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट केले. 

Web Title: Maharashtra Election 2024 Sharad Pawar has made an important statement about retiring from politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.