शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची निशाणी मशाल घराघरात पोहचवा; उद्धव ठाकरेचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 05:13 PM2024-10-18T17:13:15+5:302024-10-18T17:17:07+5:30

जो आमचा सांगोल्याचा आमदार निवडून आला तो जरी गद्दार झाला तरी सांगोलेकर माझ्यासोबत आहेत हे तुम्ही दाखवून द्यायचे आहे असं ठाकरेंनी म्हटलं. 

Maharashtra Election 2024- Shiv Sena chief Balasaheb Thackeray target Mashal reach every house; Uddhav Thackeray appeal | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची निशाणी मशाल घराघरात पोहचवा; उद्धव ठाकरेचं आवाहन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची निशाणी मशाल घराघरात पोहचवा; उद्धव ठाकरेचं आवाहन

मुंबई - येणारी निवडणूक ही सोपी नाही. धनुष्यबाण आणि मशाल असा संभ्रम ते लोकांमध्ये पसरवतात. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची निशाणी मशाल आहे, ती घराघरात पोहचवा असं आवाहन करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला. सांगोला येथील अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी आज ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, दसऱ्यानंतर आज पहिल्यांदा बोलतोय, मधल्या काळात हॉस्पिटलची वारी करावी लागली. डॉक्टर म्हणाले आराम करा, पण आधी हरामांना घालवायचे आहे. मुहूर्त चांगला आहे. आबासारखा मजबूत गडी शिवसेना परिवारात सामील झाला आहे. आबांच्या हाती मशाल दिली आहे. ही मशाल कशी पेटवायची आणि कुणाला चटके द्यायचे हे तुम्ही ठरवायचे. दीपक आबा आले म्हणजे विजय नक्की हे मला माहिती आहे. पण तुम्ही आजपासून संपूर्ण मतदारसंघात घराघरात आपली मशाल पोहचवली पाहिजे. कारण हे गद्दार आहेत ते खोके घेऊन बसले नाहीत तर धनुष्यबाण आणि मशाल असा संभ्रम ते निर्माण करतात. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची निशाणी मशाल आहे ही आतापासूनच तुम्हाला घराघरात न्यावी लागेल असं आवाहन त्यांनी केले. 

तसेच तुम्ही ज्या उत्साहाने इथं आला आहात. आपला विजय नक्की आहे. तुम्ही जाहीर करा असं मला म्हणतायेत, परंतु अद्याप मी कुणाची उमेदवारी जाहीर केली नाही. परंतु इतकेच सांगतो, दीपक आबांच्या हातात मी मशाल दिलेली आहे. त्या मशालीची धग तुम्हाला दाखवून द्यायची आहे. मी जेव्हा सभेला येईन तेव्हा विस्ताराने बोलेनच. जो आमचा सांगोल्याचा आमदार निवडून आला तो जरी गद्दार झाला तरी सांगोलेकर माझ्यासोबत आहेत हे तुम्ही दाखवून द्यायचे आहे. तुम्ही शब्दाला जागाल, आपला आमदार तुम्ही निवडून आणाल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणातला आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ज्या गद्दाराला महाराष्ट्रातील झाडी, डोंगर दिसली नाहीत. दुसऱ्या राज्यात झाडी, डोंगर पाहत बसला. त्याला झाडाच्या मुळाखाली गाडायचे आहे. योग्य व्यक्ती आपल्या पक्षात मशाल घेऊन उभी आहे. मी आबांचे राजकारण पाहतोय. त्यांचे काम पाहतोय. आबांसारखा माणूस पक्षात आला,  या निर्णयाचा गर्व वाटेल अशा प्रकारचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. आमदार म्हणून ते विजयी होतील. परंतु त्याही पुढे जात महाराष्ट्राच्या नेतृत्वमंडळात संधी मिळेल असं खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Election 2024- Shiv Sena chief Balasaheb Thackeray target Mashal reach every house; Uddhav Thackeray appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.