'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 03:41 PM2024-11-05T15:41:43+5:302024-11-05T15:44:03+5:30
Uddhav Thackeray on Batenge toh Katenge: योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या नेत्यांकडून बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा सातत्याने उल्लेख केला जात आहे. त्यावर आज ठाकरेंनी नवी घोषणा दिली.
Uddhav Thackeray Latest Speech: राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून व्होट जिहाद, बटेंगे तो कटेंगे या मुद्द्यांवर जोर दिला जात असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून दिलेल्या घोषणेला आता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील अदमापूर येथे प्रचार सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी मोदी शाह यांच्यावरही निशाणा साधला.
"१५ दिवस महाराष्ट्रात येऊन रहा"
"मी आज कोल्हापुरात मोदी आणि शाहांना विनंती करतोय की, तुम्ही महाराष्ट्रात पुढचे १५ दिवस येऊन रहा आणि जाताना तुमच्या पराभवाचे कडुलिंब घेऊन जा. याच संपूर्ण देशातील तुमचे नेते घेऊन तुम्ही महाराष्ट्रात राहायला या. सगळ्यांना माझा छत्रपतींचा महाराष्ट्र कसा पाणी पाजतो, हे संपूर्ण जगाला कळू द्या", असे आव्हान ठाकरेंनी मोदी-शाहांना दिले.
ठाकरेंनी बटेंगे तो कटेंगेला काय दिलं उत्तर?
"आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. त्यांनी एक घोषणा दिलीये, बटेंगे तो कटेंगे. कोण कापणार आहे तुम्हाला? मी एक घोषणा देतोय, आम्ही तुटू देणार नाही. आम्ही लुटू देणार नाही. आम्ही यांना तोडायला देणार नाही आणि आम्ही यांना लुटायला देणार नाही, कारण हा आमचा महाराष्ट्र आहे. मशाल धगधगणार आणि खोकेवाले जळून भस्म होणार", असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुलांनाही मोफत शिक्षण; ठाकरेंची कोल्हापुरात घोषणा
आज राज्यामध्ये मुलींना शिक्षण मोफत मिळतंय. सरकारी शाळांमध्ये. त्यांना जेवढं मोफत शिक्षण आहे, तेवढं महाराष्ट्रातील मुलांनाही मोफत शिक्षण देणार म्हणजे देणार. दोन्ही आपले आधारस्तंभ आहेत. दोन्ही आपले स्तंभ आहेत. मुलगी आणि मुलगा हे दोन्ही माझ्या महाराष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. मुलींना महाराष्ट्र सरकार मोफत उच्च शिक्षण देत आहे, तर मुलांनी काय गुन्हा केलाय? मी मुलांनाही मुलींप्रमाणे मोफत शिक्षण देणार, हे मी जाहीर करतो", अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी सभेत बोलताना केली.