"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 11:57 AM2024-11-07T11:57:43+5:302024-11-07T11:59:00+5:30
Uddhav Thackeray BJP: उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी निशाणा साधला.
Maharashtra Election 2024: उद्धव ठाकरेनी शिवसेनेचा (यूबीटी) जाहीरनामा प्रसिद्ध केला. मातोश्री येथे पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनीमहाविकास आघाडीचं सरकार आल्यास काय काय करणार, याबद्दलच्या घोषणा केल्या. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केल्याच्या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी डिवचलं.
महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री काम करत असताना उद्धव ठाकरेंना सातत्याने घरातून काम केल्याचे सांगत घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असतो. त्याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोट ठेवलं आहे.
सवय सुटली नाही; ठाकरेंना बावनकुळेंचा चिमटा
बावनकुळे यांनी म्हटलं आहे की, "अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही."
नेता घरात नाही, लोकांच्या दरात शोभून दिसतो -बावनकुळे
"हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं. पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो", असे म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं.
अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 7, 2024
अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब…
ठाकरेंच्या प्रमुख घोषणा कोणत्या?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून वचननामा म्हणून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होवू न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव ५ वर्षे स्थिर ठेवणार. जात-पात-धर्म-पंथ न पहाता, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलींप्रमाणे मोफत शिक्षण देणार. प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार, अशा घोषणा प्रामुख्याने करण्यात आल्या आहेत.