महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निर्णय विरोधाभासी : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 08:28 AM2024-08-18T08:28:41+5:302024-08-18T08:33:17+5:30
Sharad Pawar : पंतप्रधानांचा महाराष्ट्राबद्दलचा निर्णय हा विरोधाभासी आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी शनिवारी येथे केली.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी भाषण देताना सर्व देशाच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्या, या पद्धतीची भूमिका मांडली. त्यानंतर जम्मू-काश्मीर आणि हरयाणाची निवडणूक जाहीर झाली. मात्र, झारखंड आणि महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झाली नाही. पंतप्रधानांचा महाराष्ट्राबद्दलचा निर्णय हा विरोधाभासी आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी शनिवारी येथे केली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, बांगलादेशमध्ये जे घडले, त्याप्रकारे येथे घडण्याचे काही कारण नाही. अन्य देशांत घडलेल्या गोष्टींसाठी आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांचे जीवन संकटात येईल, असे काही करू नये.
आज शांततेची गरज
महाराष्ट्रात काही ठिकाणी जे काही घडले, ते राज्याच्या आणि समाजाच्या हिताचे नाही. आज शांततेची गरज आहे. यासाठी राजकारण, समाजकारणातील लोकांनी संयमाचा पुरस्कार करावा व शांतता कशी राहील, याबद्दलची खबरदारी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला.