भाजपाच्या पराभूत उमेदवारांची मानसिकता सकारात्मक - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 02:39 PM2019-11-16T14:39:26+5:302019-11-16T14:40:46+5:30
गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपाच्या उमेदवारांची बैठक आज मुंबईत झाली.
मुंबई - गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपाच्या उमेदवारांची बैठक आज मुंबईत झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उमेदवारांना मार्गदर्शन केले. दरम्यान, निवडणुकीत पराभव झाला असला तरी भाजपाच्या या उमेदवारांची मानसिकता सकारात्मक असून, त्यांनी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केले आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठक आटोपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपाच्या 59 उमेदवारांची आज बैठक झाली. या बैठकीत पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यात आला. तसेच या उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान ही बैठक संपल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, ''विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षांनी मिळून एकूण 164 जागा लढवल्या होत्या त्यापैकी 105 जागांवर आम्हाला विजय मिळाला. तर 59 जागांवर पराभव पत्करावा लागला. त्यापैकी काही जागांवर अगदी निसटत्या फरकाने पराभव झाला. आज या पराभूत उमेदवारांची बैठक झाली. तिथे या पराभवाच्या कारण्यांचा आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान सर्व पराभूत उमेदवारांची मानसिकता सकारात्मक दिसून आली. त्यांनी आता आगामी निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या उमेदवारांनी कामाला सुरुवात केली आहे.''
''या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पराभूत आमदारांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी राज्यात भारतीय जनता पक्षाचंच सरकार स्थापन होईल, असा विश्वास उपस्थित त्यांनी पराभूत उमेदवारांनी दिला. तसेच पराभूत झालेल्या उमेदवारांना राजकीय बळ मिळावे यासाठी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना सरकारमध्ये तसेच पक्षसंघटनेत सामावून घेण्यात येणार आहे,'' असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.