Maharashtra CM: उद्धव ठाकरे यांचे पक्षांतर्गत किचन कॅबिनेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 06:17 AM2019-11-29T06:17:07+5:302019-11-29T06:17:50+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानिमित्त जाणून घेऊया उद्धव ठाकरे यांच्या पक्षांतर्गत किचन कॅबिनेटविषयी.

Maharashtra Election, Maharashtra CM: Uddhav Thackeray's Kitchen cabinet in party | Maharashtra CM: उद्धव ठाकरे यांचे पक्षांतर्गत किचन कॅबिनेट

Maharashtra CM: उद्धव ठाकरे यांचे पक्षांतर्गत किचन कॅबिनेट

Next

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानिमित्त जाणून घेऊया उद्धव ठाकरे यांच्या पक्षांतर्गत किचन कॅबिनेटविषयी.

आदित्य ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे थोरले चिरंजीव. ते युवासेनेचे प्रमुख या नात्याने युवक संघटना सांभाळत आहेत. राज ठाकरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आदित्य यांना युवकांची संघटना करण्यासाठी पुढे आणण्यात आले. आदित्य यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट व अन्य निवडणुकांमध्ये अभाविप व मनसेची विद्यार्थी संघटना यांच्यावर मात दिली. उद्धव यांच्यासारखे आदित्य यांच्याकडेही संघटनकौशल्य आहे. मुंबईत जिजामाता उद्यानात पेंग्वीन आणण्याची कल्पना आदित्य यांचीच होती. आदित्य हे कवी असून त्यांचे दोन कवितासंग्रहही प्रकाशित झाले आहेत. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व हे त्यांचे वैशिष्ट्य.

तेजस ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे द्वितीय पुत्र. आदित्य यांच्या हाती तलवार सोपवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या राजकारणातील प्रवेशाची घोषणा केली तेव्हा आदित्य हे उद्धव यांच्यासारखे आहेत तर तेजस हा माझ्यासारखा आक्रमक असल्याचा उल्लेख केला होता. ‘तेजसची तोडफोड सेना’, असा उल्लेख बाळासाहेबांनी केला होता. तेजस यांनाही प्राण्यांची आवड आहे. घरातील अ‍ॅक्वेरियममध्ये ते रमतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापांच्या दुर्मीळ प्रजातींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या तेजस यांनी खेकड्यांच्या दुर्मीळ प्रजातींचा शोध लावला आहे. मात्र अद्याप ते राजकारणात सक्रिय झालेले नाहीत.

रश्मी ठाकरे
रश्मी ठाकरे या उद्धव यांच्या पत्नी. त्या मूळच्या कोकणातील. मात्र त्यांचे बालपण डोंबिवलीत गेले. रश्मी यांना एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. उद्घव यांच्या प्रचारात किंवा अगदी त्यांनी केलेल्या अयोध्या दौऱ्यातही रश्मी त्यांच्यासह गेल्या होत्या. उद्धव यांच्यासह त्यांनी गंगापूजनही केले होते. शिवसेनेच्या राजकारणात त्या सक्रिय झाल्या असून आदित्य यांच्या प्रचारातही त्यांनी भाग घेतला होता. उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारावी, याकरिता त्यांचे मन वळवण्यात त्यांची मोठी भूमिका असल्याचे बोलले जाते. शिवसैनिक व महिला कार्यकर्त्या यांच्यासाठी त्या रश्मी वहिनी आहेत.

मिलिंद नार्वेकर
एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले मिलिंद नार्वेकर हे शाखाप्रमुख होण्यासाठी मुलाखत देण्याकरिता उद्धव यांना पहिल्यांदा भेटले. त्यांच्यातील चमक पाहून उद्धव यांनी त्यांना स्वत:सोबत काम करण्याची सूचना केली. त्यांनी ती तात्काळ मान्य केली. तेव्हापासून नार्वेकर हे सावलीसारखे उद्धव यांच्यासोबत आहेत. पक्षापासून दुरावलेल्या नारायण राणे, राज ठाकरे यांच्या टीकेचे लक्ष्य मिलिंद नार्वेकर हेच होते. संघटनेत महत्त्वाची पदे उद्धव यांच्या विश्वासू व्यक्तींकडे जातील, हे पाहण्यापासून ते राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार होईपर्यंतच्या अनेक घटनांमध्ये त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.

हर्षल प्रधान
हे पूर्वाश्रमीचे पत्रकार आहेत. हर्षल यांनी स्वत:ला नोकरीच्या बंधनात अडकवून न घेता फ्रीलान्स (मुक्त) पत्रकार म्हणूनही काही काळ काम केले. भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते नितीन गडकरी यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. कालांतराने ते शिवसेनेच्या वर्तुळात आले. प्रारंभी त्यांनी उद्धव यांच्या प्रसिद्धीचे आणि नंतर आदित्य हे राजकारणात सक्रिय झाल्यावर हर्षल यांच्याकडे आदित्य ठाकरे यांच्या प्रसिद्धीचेही काम सोपवले गेले. शांत स्वभाव, आवश्यक तितकेच संभाषण हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

आदेश बांदेकर
हे एक नामांकित कलाकार असून वाहिन्यांवरील ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे लोकप्रिय झाले. आदेश बांदेकर यांचा शिवसेनेशी संपर्क आला तो चित्रपट सेनेच्या माध्यमातून. मात्र अल्पावधीत रश्मी व उद्धव ठाकरे यांची मर्जी त्यांनी संपादन केली. बांदेकर यांची स्वच्छ प्रतिमा व मध्यमवर्गीयांमधील करिष्मा पाहून शिवसेनेने त्यांना अनेक ठिकाणी प्रचाराकरिता पाठवले व त्याचा पक्षाला लाभ झाला. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी दिली गेली. बांदेकर हे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असून, त्यांनी हजारो रुग्णांना आर्थिक मदत देऊ केली आहे.

अनिल देसाई
शिवसेनेतील आक्रमक नेत्यांना बाजूला सारून उद्धव ठाकरे यांनी नेमस्त नेत्यांची फळी आपल्यासोबत उभी केली. त्यामधील एक नाव अनिल देसाई यांचे आहे. देसाई हे उच्चविद्याविभूषित असून ते विमा व अन्य क्षेत्रातील सफेद कॉलर कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे नेते आहेत. ते शिवसेनेचे सचिव असून युतीच्या जागा वाटपाच्या वाटाघाटींमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या मागील सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेण्याकरिता उद्धव यांनी त्यांना पाठवले होते. मात्र राज्याच्या सरकारमधील सेनेच्या सहभागावरून सुरू असलेल्या वादात मंत्रिपदाची शपथ न घेताच ते परत आले होते.

संजय राऊत
एका मराठी साप्ताहिकात वार्ताहर असलेल्या संजय राऊत यांचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दैवत होते. राऊत यांचे गुन्हेगारी विश्वाबाबतचे लोकप्रिय लेखन व धारदार शैली यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना ‘सामना’ च्या कार्यकारी संपादकपदासाठी बोलावून घेतले. संजय निरुपम यांच्या पाठोपाठ शिवसेनेतील या संजय यांचाही राजकीय उदय झाला. निरुपम नंतर शिवसेनेपासून दुरावले. बाळासाहेबांच्या शैलीत सामनाचे अग्रलेख लिहून राऊत यांनी शिवसैनिकांमधील चेतना जागृत ठेवली. भाजपवर सातत्याने व कठोर टीका करणारा शिवसेनेचा नेता अशी त्यांची ओळख बनली आहे.

एकनाथ शिंदे
ठाण्यातील शिवसेना एकेकाळी आनंद दिघे यांच्या ताब्यात होती. त्यावेळी त्यांचे निकटचे कार्यकर्ते असलेल्या एकनाथ शिंदे यांना आनंद दिघे यांनी संघटनात्मक कामाचे बाळकडू पाजले. रात्री अपरात्री दिघे यांच्यासोबत फिरणाºया शिंदे यांनी दिघे यांच्या पश्चात शिवसेनेची जिल्ह्यातील ताकद टिकवून ठेवली, खरे तर वाढवली. शिंदे हे उत्तम संघटक असून अडचणीतील निवडणूक सोपी करून जिंकून आणण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वीकारली नसती तर त्या पदाकरिता सर्वात प्रबळ दावेदार शिंदे हेच होते. विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणूनही त्यांचीच निवड झाली.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra CM: Uddhav Thackeray's Kitchen cabinet in party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.