Maharashtra Government: कोणत्याही परिस्थितीत त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 05:10 AM2019-11-24T05:10:27+5:302019-11-24T05:11:40+5:30
भाजप आणि अजित पवार यांनी ज्या पद्धतीने सरकार स्थापन केले, ते पहाता त्यांना कोणत्याही परिस्थितीत बहुमत सिद्ध करता येणार नाही.
मुंबई : भाजप आणि अजित पवार यांनी ज्या पद्धतीने सरकार स्थापन केले, ते पहाता त्यांना कोणत्याही परिस्थितीत बहुमत सिद्ध करता येणार नाही. त्यांच्याकडे तेवढे आमदार नाहीत, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी
व्यक्त केला. तसेच अजित पवार यांची ही कृती बेशिस्तभंगाची असून पक्ष त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील सकाळच्या राजकीय घडामोडीनंतर शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुुक्त पत्रकार परिषद घेतली. पवार म्हणाले, बहुमताचा आकडा आमच्याकडे आहे. शिवसेनेचे ५६ राष्ट्रवादीचे ५४ काँग्रेसचे ४४ असे १५६ तर मित्र पक्षाचे मिळून आमच्याकडे १६९ ते १७० आमदार आहेत. भाजपकडे एवढी संख्या नाही. त्यामुळे सरकार बनवण्याची आम्ही तयारी केली होती. मात्र काल रात्रीच्या बैठकीनंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राज्यपालांनी कार्यतत्परता दाखवली, ते पाहून मला समाधान वाटले, असा टोलाही पवार यांनी लगावला.
अजित पवार यांचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाच्या धोरणाच्या विरोधात आहे. शिस्तभंगाच्या व्याख्येत बसणारा आहे. विधिमंडळाचे सदस्य असो अथवा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, कोणीही प्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत जाणार नाही, अशा शब्दात पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जे सदस्य गेले किंवा जाणार असतील, त्यांना आपल्या देशात पक्षांतर बंदीचा कायदा असल्याची जाणीव आहे. त्यांचे सदस्यत्व जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज जनमानसात भाजपच्या विरोधात आहे, ते पाहता जे लोक पक्ष सोडून जातील त्यांच्या मतदारसंघात त्यांना पाठिंबा मिळणार नाही. पुन्हा जर निवडणुका झाल्या तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिन्ही पक्षाचे नेते मिळून त्या उमेदवाराच्या विरोधात सर्व शक्ती लावतील. त्यांना पराभूत करतील असेही पवार यावेळी म्हणाले. पक्ष सोडून जातील त्यांच्या मतदारसंघात त्यांना पाठिंबा मिळणार नाही. पुन्हा जर निवडणुका झाल्या तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे नेते मिळून त्या उमेदवाराच्या विरोधात सर्व शक्ती लावतील, आणि त्यांना पराभूत करतील असेही पवार यावेळी म्हणाले.
या पत्रकार परिषदेत आमदार राजेंद्र शिंगणे, आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार सुनील भुसारा यांना हजर केले. तिघांनीही त्यांना कसे चुकीची माहिती देऊन राजभवनावर नेण्यात आले, याची कहाणी सांगितली. हा सूर्य हा जयद्रथ या नात्याने पवार यांनी पत्रकार परिषदेत खरेखोटे करण्याचा प्रयत्न केला.
‘ते’ पत्र बैठकीचे होते!
राष्ट्रवादी पक्षाने निवडून आलेल्या सदस्यांची यादी तयार केली होती. या यादीवर आमदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या. ही यादी बैठकीच्या वेळी तयार केली होती. मंडळाचे नेते म्हणून ही यादी त्यांच्याकडे होती. अंतर्गत कारणासाठी सह्या घेण्यात आल्या होत्या. त्या ५४ जणांच्या पाठिंब्याची यादी म्हणून त्यांनी राज्यपालांना दाखवली की काय? आणि राज्यपालांची फसवणूक केली का असा प्रश्न आपल्यासमोर आहे असेही पवार यावेळी म्हणाले.