Maharashtra Government: भाजपाला विधिमंडळात सिद्ध करावे लागेल बहुमत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 04:20 AM2019-11-24T04:20:53+5:302019-11-24T04:21:14+5:30

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील गटनेता आहेत. त्यामुळे गटनेता म्हणून त्यांना पक्षाच्या आमदारांचे समर्थनपत्र देण्याचा अधिकार आहे.

Maharashtra Election, Maharashtra Government: BJP has to prove majority in legislature | Maharashtra Government: भाजपाला विधिमंडळात सिद्ध करावे लागेल बहुमत

Maharashtra Government: भाजपाला विधिमंडळात सिद्ध करावे लागेल बहुमत

googlenewsNext

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील गटनेता आहेत. त्यामुळे गटनेता म्हणून त्यांना पक्षाच्या आमदारांचे समर्थनपत्र देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी भाजपकडे समर्थनपत्र दिलेही असेल, पण खरी परीक्षा ही विधिमंडळात बहुमत सिद्ध करताना असेल. राष्ट्रवादीच्या गटनेत्याचे समर्थनपत्र मिळाल्यानंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचा सरकार स्थापनेचा दावा मान्य करणे राज्यपालांना भाग आहे व त्यानुसार त्यांनी तो मान्य करीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी करवून घेतला. पण तो इतक्या सकाळी घेण्याचे औचित्य सांगता येणार नाही.

मात्र सध्यातरी अजित पवार यांनी कागदावर समर्थनपत्र सादर केले आहे आणि हे समर्थन त्यांना विधिमंडळात सिद्ध करावे लागणार आहे. राहिला प्रश्न आमदारांच्या अपात्र ठरण्याचा तर आमदारांनी अद्यापपर्यंत पदाची शपथ घेतली नसल्याने सध्या अपात्र ठरण्याचा नियम लागू होत नाही. एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यास त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो. मात्र एखाद्या पक्षाचे दोन तृतीयांश आमदार पक्ष सोडून वेगळा गट स्थापन करीत असल्यास त्यांचे आमदारपद अपात्र ठरत नाही. त्यामुळे आता विधिमंडळात बहुमत सिद्ध करतानाच कळेल की त्यांच्याकडे किती आमदारांचे समर्थन आहे. विधिमंडळात राष्ट्रवादीच्या समर्थनाने बहुमत सिद्ध केल्यास हे सरकार पुढे कायम राहील, अन्यथा ते सरकार कोसळेल. अटलबिहारी वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते, त्यावेळी अशाचप्रकारे घटनाक्रम घडला होता. त्यावेळी कागदावर खासदारांनी समर्थनपत्र दिल्यानंतर वाजपेयी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती, मात्र अवघ्या १३ दिवसांत सरकार कोसळले होते. त्यानंतर पुन्हा अशाच प्रकारच्या घटनाक्रमात त्यांच्याच नेतृत्वातील सरकार १३ महिन्यांत कोसळले होते. त्यामुळे विधिमंडळात बहुमत सादर करताना काय घडामोडी घडतात, यावर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील नव्या सरकारचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
- अ‍ॅड. फिर्दोस मिर्झा, ज्येष्ठ विधिज्ञ, नागपूर

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: BJP has to prove majority in legislature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.