राज्यात चाललेल्या सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकाकडे भाजपाचे लक्ष - आशीष शेलार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 09:02 AM2019-11-15T09:02:22+5:302019-11-15T09:03:05+5:30
मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या वादानंतर भाजपापासून दुरावलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसशी जवळीक साधत सत्तास्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या वादानंतर भाजपापासून दुरावलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसशी जवळीक साधत सत्तास्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या तिन्ही पक्षांमध्ये सरकार स्थापनेबाबत बऱ्यापैकी एकमत झाले आहे. दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकाकडे भाजपाचे लक्ष आहे, असे आशीष शेलार यांनी सांगितले.
भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेलार म्हणाले की, ''राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भाजपाचे आमदार पाहणी दौरा करणार आहेत. तसेच राज्यात 90 हजार बुथांवर होणाऱ्या संघटनात्मक निवडणुकांबाबत कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा झाली. त्याबरोबरच राज्यात सत्तास्थापनेसाठी सुरू असलेल्या तीन अंकी नाटकाकडेही आमचे लक्ष आहे.''
दरम्यान, चिंता करु नका, वेळ लागेल पण सरकार आपलंच येणार’ असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भाजप आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला होता. तुम्ही मुंबईला आता यायचं नाही. इथून निघून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जा अन् त्यांचं दु:ख हे आपलं दु:ख असल्याचं मानून कामाला लागा, असे ते म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सर्व माजी मंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत फडणवीस म्हणाले, सत्तास्थापनेबाबत येत असलेल्या कोणत्याही बातम्यांनी तुम्ही विचलित होऊ नका. योग्यवेळी योग्य निर्णय होईल. सरकार आपलेच येणार आहे. भाजप वगळता कोणतेही सरकार होऊ शकत नाही. तुम्ही मुंबईत थांबू नका, पुढचे दोनतीन दिवस शेतकऱ्यांच्या बांधावरच तुम्ही दिसले पाहिजे. शेतकºयांना भक्कम मदत मिळेल यावर जातीने लक्ष द्या.