Maharashtra Government: भाजपची रणनीती : बहुमतासाठी मुख्यमंत्र्यांचे आता ‘ऑपरेशन लोटस’!

By यदू जोशी | Published: November 25, 2019 08:34 AM2019-11-25T08:34:07+5:302019-11-25T08:35:43+5:30

अजित पवार यांच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आॅपरेशन लोटस हाती घेतले आहे.

Maharashtra Election, Maharashtra Government: BJP's Strategy: Chief Minister's 'Operation Lotus' for Majority Now! | Maharashtra Government: भाजपची रणनीती : बहुमतासाठी मुख्यमंत्र्यांचे आता ‘ऑपरेशन लोटस’!

Maharashtra Government: भाजपची रणनीती : बहुमतासाठी मुख्यमंत्र्यांचे आता ‘ऑपरेशन लोटस’!

Next

- यदु जोशी
मुंबई : अजित पवार यांच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आॅपरेशन लोटस हाती घेतले आहे. त्यानुसार, इतर पक्षातील आमदारांना भाजपमध्ये आणण्यासाठी पक्षातील ६ ते ७ नेत्यांवर जबाबदारी टाकण्यात
आली आहे.

गेल्या काही वर्षांत इतर पक्षामधून भाजपमध्ये आलेल्या बड्या नेत्यांना या ‘आॅपरेशन लोटस’ची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भाजप आमदारांच्या बैठकीत आॅपरेशन लोटसचे सूतोवाच केले. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक जिंकण्यासाठी आणि सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते संख्याबळ आपल्याकडे आहेच, पण आपण अधिक संख्येनिशी दोन्ही गोष्टींबाबत यशस्वी व्हायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेस राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांवर या आॅपरेशनची विशेष जबाबदारी टाकण्यात आली आहे. जुन्या पक्षांमधील आपल्या संबंधांचा वापर करा आणि अधिकाधिक आमदारांना जोडा, असे आवाहन आजच्या बैठकीत करण्यात आले. या नेत्यांना भाजपची आॅपरेशन लोटस कोअर टीम मदत करेल. त्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, पंकजा मुंडे असे नेते असतील. त्यांच्या मदतीला भाजपच्या चार तरुण आमदारांची टीम असेल.

इतर पक्षांमधील आमदारांना फोडून सरकार स्थापन करणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी सुरुवातीला मांडली होती. मात्र, नंतर घडलेल्या प्रचंड घडामोडींमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपच्या गळाला लागले आणि थेट उपमुख्यमंत्री झाले. आता भाजपचे संख्याबळ वाढविण्यासाठी आॅपरेशन लोटस हाती घेण्यात येणार आहे. भाजप-शिवसेनेचे पाच वर्षे सरकार असताना भाजपकडे बहुमत नव्हते. त्यामुळे शिवसेनेचा विरोध, टीका सहन करत फडणवीस त्यांना तारेवरची कसरत करावी लागली होती. यावेळी ही परिस्थिती राहू नये, म्हणून भाजपचे संख्याबळ वाढविण्यासाठी आॅपरेशन लोटस राबविण्यात येणार असल्याचे मानले जाते.

भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष गुजरातमध्ये

भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांनाही तातडीने गुजरातला हलविले आहे. चार ते पाच जणांचे गट करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आणि स्वतंत्र हॉटेलमध्ये ठेवले आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने त्यांच्याशी संपर्क साधू नये, म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.
 

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: BJP's Strategy: Chief Minister's 'Operation Lotus' for Majority Now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.