Maharashtra Government: भाजपच्या बड्या नेत्यांनाही नव्हती ‘ऑपरेशन’ची कल्पना, कार्यकर्त्यांचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 04:32 AM2019-11-24T04:32:59+5:302019-11-24T07:08:01+5:30
शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारच्या पहाटेपर्यंत जे सत्तानाट्य भाजप-अजित पवार यांच्यात घडले त्याची कल्पना बोटावर मोजण्याइतके नेते सोडले तर राज्यातील बड्या भाजप नेत्यांनादेखीेल नव्हती.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारच्या पहाटेपर्यंत जे सत्तानाट्य भाजप-अजित पवार यांच्यात घडले त्याची कल्पना बोटावर मोजण्याइतके नेते सोडले तर राज्यातील बड्या भाजप नेत्यांनादेखीेल नव्हती. गेले काही दिवस निराशेचे वातावरण अनुभवणाऱ्या प्रदेश भाजप कार्यालयात दुपारनंतर एकच जल्लोष झाला.
शनिवारी सकाळी शपथविधीलाही दिल्लीहून आलेले प्रभारी भूपेंद्र यादव, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, संघटन मंत्री विजय पुराणिक एवढेच हजर होते. थोड्या वेळाने डॉ.संजय कुटे आले. शपथविधीला भाजप नेत्यांव्यतिरिक्त फडणवीस यांच्या पत्नी अमृता, कन्या दिविजा, आई सरिता, काकू शोभाताई फडणवीस, बहीण मंजुताई दीक्षित असे निवडक लोक हजर होते. शपथविधीला निघण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधिवत छोटेखानी पूजा केली.
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारच सत्तेत येणार आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार हे शुक्रवारी जवळपास स्पष्ट झाल्यानंतर भाजपच्या तंबूत कमालीची अस्वस्थता पसरली. १०५ आमदार निवडून आले, १३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा असूनही आपले सरकार येत नाही म्हटल्यावर भाजपचे आमदार तर अधिकच हवालदिल झाले. अनेकांनी मुंबई सोडून आपल्या मतदारसंघात जाणे पसंत केले होते. काही जण तर एवढे सगळे शिवसेनेला अनुकूल घडत असताना आपले नेते काहीही करत नाहीत म्हणून मोदी-शहा-फडणवीसांबाबत खासगीत नाराजीही व्यक्त करीत होते.
शनिवारची सकाळ धक्कातंत्राला जन्म देतच आली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले अन् भाजपच्या गोटात प्रचंड उत्साहाचे वातावरण पसरले. चांद्यापासून बांद्यापर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. भाजपच्या प्रदेश कार्यालयात फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष पाटील आदी नेते या कार्यालयात पोहोचले तेव्हा संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला. गेला महिनाभर असलेला ताण दूर झाला.
संजय राऊत यांनी सेनेचा सत्यानाश केला - पाटील
खा. संजय राऊत यांनी गेले काही दिवस वाट्टेल तसे बोलून शिवसेनेचा सत्यानाश करण्याचे काम केले. आता तरी त्यांनी चूप बसावे, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले की, आम्ही शिवसेनेचे इतके वर्ष मित्र होतो पण त्यांनी आमच्या पक्षाचा, आमच्या नेत्यांचाही सन्मान राखला नाही. निकालानंतर एकत्रितपणे सरकार स्थापन करण्याऐवजी ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बसले. हेच त्यांचे हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आहे का? संजय राऊत म्हणाले त्याप्रमाणे त्यांचे नेतृत्व वागत राहिले ही दुर्दैवाची बाब आहे. सत्तेसाठी अधीर झालेल्या शिवसेनेने सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडण्याचे काम केले, अशी टीका पाटील यांनी केली.
फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा एकदा राज्याला स्थिर सरकार देऊ. बहुमत आमच्यासोबत आहे. १६० हून अधिक आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, असे ते म्हणाले.
२४ आॅक्टोबर
विधानसभा निवडणुकीचा निकाल; भाजप- शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत
२५ आॅक्टोबर
मुख्यमंत्रिपदासह मंत्रिमंडळातही ‘फिफ्टी-फिफ्टी’चा आग्रह शिवसेनेने धरल्याने महायुतीत महातणावाची स्थिती.
२६ आॅक्टोबर
शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास पाठिंब्याचा विचार करू, अशी आॅफर काँग्रेसने दिली.
२७ आॅक्टोबर
शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दबाव वाढविला. मुख्यमंत्री आमचाच असेल, असे भाजपकडूनही स्पष्टीकरण.
३० आॅक्टोबर
भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड
राष्टÑवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार.
३१ आॅक्टोबर
सत्तावाटपावरून ठाकरे-फडणवीसांमध्ये तणाव.; शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची, तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांची एकमताने निवड.
१ नोव्हेंबर
शिवसेनेने भाजपला बाजूला सारून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन करता येते का, याची चाचपणी सुरू केली.
शिवसेनेची वाट न पाहता स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली करा, असे स्पष्ट आदेश भाजप श्रेष्ठींनी दिले.
भाजपने आपल्या १०५ आमदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत मुंबई सोडून बाहेर न जाण्याचे आदेश दिले.
२ नोव्हेंबर
काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. राज्यातील परिस्थितीचा आढावा.
मुख्यमंत्री फडणवीस हे सत्तास्थापनेबाबत एकटे पडल्याची शिवसेनेची टीका.
३ नोव्हेंबर
सत्तास्थापनेसाठी १७५ आमदारांच्या पाठिंब्याचा शिवसेनेचा दावा.
मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल आणि शिवतीर्थावर शपथविधी होईल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला.
४ नोव्हेंबर
दिल्लीत राजकीय खलबतं झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा, राज्य प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसंदर्भात रणनीती निश्चित केली. शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन महाराष्टÑातील राजकीय सद्य:स्थितीवर चर्चा केली.
सरकार स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव आल्यास राष्टÑवादी काँग्रेस त्यास पाठिंबा देणार असल्याचे संकेत मात्र शरद पवार यांनी सस्पेन्स कायम ठेवला.
५ नोव्हेंबर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालकांना भेटले.
६ नोव्हेंबर
शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करायची नाही, अशी भाजपने घेतलेली भूमिका, काँग्रेस आणि राष्टÑवादीकडून शिवसेनेला पाठिंब्याबाबत न मिळालेला हिरवा कंदील, यामुळे राज्याची पावले राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने.
७ नोव्हेंबर
भाजपकडून सत्तेसाठी दावा नाही, तर मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना अडूनच.
८ नोव्हेंबर
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री.
शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचा फॉर्म्युला अमित शहा व माझ्यात मातोश्रीवरच झाला होता. मुख्यमंत्री त्यावेळी उपस्थित होते. मी खोटे बोलणार नाही. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार या भूमिकेवर मी ठाम आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
९ नोव्हेंबर
राज्यपालांकडून फडणवीसांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण
१0 नोव्हेंबर
सत्तास्थापनेस भाजपचा नकार.; राज्यपालांचे शिवसेनेला निमंत्रण.
११ नोव्हेंबर
अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा. भाजप व शिवसेनेचे नाते तब्बल ३० वर्षांनी संपुष्टात आले.
महा आघाडीच्या पाठिंब्याची पत्रे मुदतीत देण्यात शिवसेनेला अपयश; राज्यपालांकडून सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण.
१२ नोव्हेंबर
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट!
१३ नोव्हेंबर
बिगर भाजप सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादीच्या समन्वय समितीची दहा तास बैठक.
१४ नोव्हेंबर
राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि कॉँग्रेस-राष्टÑवादीत सहमती नाहीे, कॉँग्रेसचा निर्णय दिल्लीतच होणार असल्याने राज्यात १७ नोव्हेंबरपूर्वी सत्ता स्थापन होणे अशक्य
१५ नोव्हेंबर
शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय दिल्लीत होईपर्यंत त्या पक्षाच्या नेत्यांसह राज्यपालांना भेटायला जाणे
योग्य होणार नाही, अशा सूचना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्यामुळे राज्यपालांची भेट रद्द.
१६ नोव्हेंबर
शिवसेना अखेर ‘रालोआ’तून बाहेर शिवसेना आता राष्टÑीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) अधिकृतरीत्या बाहेर .
१७ नोव्हेंबर
शरद पवार-सोनिया गांधी यांच्यातील चर्चा अपूर्णच! २८८ पैकी १७० आमदारांची पाठिंब्याची पत्रे लवकरच राज्यपालांना सादर करण्याचा, खा. संजय राऊत यांचा विश्वास
१८ नोव्हेंबर
शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षनेत्यांना फॉर्म्युल्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करायला सांगितले.
२0 नोव्हेंबर
महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवून शिवसेनेसह सरकार स्थापन करण्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकमत .
शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
२१ नोव्हेंबर
शिवसेनेचा मुख्यमंत्री निश्चित, राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री एका फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १५ मंत्रिपदे मिळतील आणि राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या वाट्याला प्रत्येकी उपमुख्यमंत्रिपदासह अनुक्रमे १५ व १३ मंत्रिपदे येतील. दुस-या प्रस्तावात शिवसेनेचा मुख्यमंत्री, काँग्रेस व राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद आणि तिन्ही पक्षांचे प्रत्येकी १४ मंत्री असा उल्लेख आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांची मध्यरात्री भेट राज्यपालांचा दिल्ली दौरा रद्द
२२ नोव्हेंबर
उद्धव ठाकरेच होणार
मुख्यमंत्री, राजकीय अस्थिरता
राज्यातील राजकीय अस्थिरता संपुष्टात येऊन महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेची घटिका समीप आली. उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले. शनिवारी संध्याकाळी सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता.
२३ नोव्हेंबर
राष्ट्रवादीत फूट; देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी