सरकारच्या स्थैर्याबद्दल देवेंद्र फडणवीस निश्चिंत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 08:04 AM2019-11-25T08:04:48+5:302019-11-25T08:05:10+5:30
चिंता करू नका, आपण सरकार स्थापन करताना पूर्ण विचारांती केलेले आहे. हे सरकार पाच वर्षे टिकणारच. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावदखील आपण जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भाजपाच्या आमदारांना दिला.
मुंबई - चिंता करू नका, आपण सरकार स्थापन करताना पूर्ण विचारांती केलेले आहे. हे सरकार पाच वर्षे टिकणारच. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावदखील आपण जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भाजपाच्या आमदारांना दिला.
वसंत स्मृती या दादरमधील भाजपच्या कार्यालयात ही बैठक झाली. त्यास प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील, केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव आणि कोअर कमिटीचे सदस्य मंचावर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सोबत घेण्याचा निर्णय मजबूत सरकारच्या दृष्टीने घेतलेला आहे. आपल्या सरकारला कुठलाही धोका नाही. सरकारच्या स्थैर्याबद्दल घेतल्या जाणाऱ्या शंकांवर विश्वास ठेवू
नका.
बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ आमदार लागतात. त्यापेक्षा पुष्कळ जास्त आमदार आजच आपल्याकडे आहेत याबाबत खात्री बाळगा, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिवसेनेवरही टीका केली. आपला इतक्या वर्षांचा मित्र पक्ष आपल्यासोबत राहील, असे मनोमन वाटत होते पण त्यांच्या मनात वेगळेच होते. नंतर त्यांची आपल्यासोबत येण्याची मानसिकता नव्हती. या ना त्या कारणाने ते सत्तास्थापनेची चर्चा टाळत राहिले. त्यांना आपल्या सोबत यायचे नव्हते. इतर पक्षांनी त्यांची फसवणूक केली आणि ते देखील या फसवणुकीला बळी पडले.
फडणवीस-पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आमदारांच्या बैठकीत पारित करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रावसाहेब दानवे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित होते.