Maharashtra Government:...तर शिवसेना पुन्हा एकदा भाजपासोबत युती करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 09:05 AM2019-11-20T09:05:51+5:302019-11-20T09:34:43+5:30

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिन्याभराचा अवधी लोटला तरी महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही.

Maharashtra Election, Maharashtra Government: ...If BJP Positive For 50-50 deal, then Shiv Sena will once again have alliance with BJP | Maharashtra Government:...तर शिवसेना पुन्हा एकदा भाजपासोबत युती करणार

Maharashtra Government:...तर शिवसेना पुन्हा एकदा भाजपासोबत युती करणार

Next

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिन्याभराचा अवधी लोटला तरी महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही. स्पष्ट बहुमतानंतर मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या वादामुळे शिवसेना आणि भाजपात निर्माण झालेला दुरावा, तसेच एनडीएला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्यास चालढकल सुरू केल्याने राज्यात सत्तापेच निर्माण झाला आहे. दरम्यान, एकीकडे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्तावाटपाबाबत चर्चा करत आहे. तर दुसरीकडे भाजपाने ५०-५० टक्के सत्तावाटपाचा फॉर्म्युला मान्य केल्यास शिवसेना पुन्हा एकदा भाजपासोबत युती करण्याचा विचार करू शकते, अशी माहिती शिवसेनेमधील सूत्रांनी दिली आहे.

यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार भाजपाने ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर सहमती दर्शवली आणि सत्तास्थानांचे समसमान वाटप करण्याची तयारी दाखवली, तर शिवसेनेला भाजपासोबतच्या युतीचे बंध पुन्हा बांधण्यास आनंदच होईल, असे शिवसेनेतील सूत्रांनी म्हटले आहे. भाजपा आणि शिवसेना या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षामध्ये महाराष्ट्रात सुमारे ३० वर्षांपासून युती होती. मात्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची केलेली आग्रही मागणी आणि त्याला भाजपाने दिलेल्या ठाम नकारानंतर दोन्ही पक्षांतील युती मोडली होती.

दरम्यान, सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबच सत्तास्थापनेसाठीची चर्चा योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. शरद पवार आणि आमच्या आघाडीची काळजी तुम्ही अजिबात करू नका. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील आघाडी राज्यात लवकरच सरकार स्थापन करणार आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.

भाजपाचा प्लान बी; राष्ट्रवादीसोबत आघाडीची तयारी

भाजपानं सत्ता स्थापनेसाठी प्लान बीदेखील तयार ठेवला आहे. यामध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची भूमिका असेल. भाजपाचे 105 तर राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत. त्यांचं संख्याबळ 159 होतं. याशिवाय भाजपाला लहान पक्ष व अपक्ष अशा 14 आमदारांचा पाठिंबा पाहता, संख्याबळ 173 होतं. राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी झाली नाही, तरी भाजपला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनुपस्थित राहून मदत करू शकते. राष्ट्रवादीचे 54 सदस्य अनुपस्थित राहिल्यास सभागृहात 234 सदस्य उरतात. अशा वेळी बहुमतासाठी भाजपला 117 आमदारांची गरज असेल आणि भाजपकडे 119 आमदार आहेत. त्यामुळे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकू शकेल. याच पद्धतीनं राष्ट्रवादीनं 2014 मध्ये भाजपाला मदत दिली होती. त्यामुळे शिवसेनेची मोठी कोंडी झाली होती.  दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला साथ दिल्यास शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याची तयारी भाजपाने केली आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत राज्यातील राजकारण कोणते वळण घेते हे पाहावे लागेल. 

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: ...If BJP Positive For 50-50 deal, then Shiv Sena will once again have alliance with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.