Maharashtra Government: राज्यपालांच्या भूमिकेवर तिन्ही पक्षांचे प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 05:07 AM2019-11-24T05:07:59+5:302019-11-24T07:11:53+5:30
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मध्यरात्रीनंतर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्याची शिफारस केली आणि ती उठताच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना सकाळी ७.४५ वाजता मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. आकस्मिकपणे घडलेल्या या घडामोडीवर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ आॅक्टोबर रोजी लागला, त्यानंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासंदर्भात समर्थता दर्शविण्यासाठी मुदत दिली. भाजपने असमर्थता व्यक्त करताच, शिवसेनेला सरकार स्थापन करण्याचा दावा सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली. शिवाय शिवसेनेला पाठिंब्यासंदर्भात आमदारांच्या सह्यांचे स्वतंत्र पत्रे सादर करण्यास सांगितले होते. हा नियम फडणवीस व अजित पवार यांना का लावण्यात आला नाही, असा सवाल शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आजच्या घडामोडींनंतर उपस्थित केला आहे.
शहानिशा केली का-नवाब मलिक
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून आमदारांचे जे पत्र सादर केले, त्यातील नावांची वा खरोखर त्या आमदारांचा पाठिंबा आहे का, याची शहानिशा केली का, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला.
फडणवीस व अजित पवार यांनी राज्यपालांना किती आमदारांच्या आणि किती वाजता पाठिंब्याचे पत्र दिले?याचे उत्तर राज्यपालांनी द्यायला हवे, अशी मागणी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे.