Maharashtra Government: फडणवीस सरकार पाडण्यासाठी विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 08:44 AM2019-11-25T08:44:03+5:302019-11-25T08:46:17+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या सरकारला विधानसभेत तोंडघशी पाडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे.

Maharashtra Election, Maharashtra Government: Strong front of the opposition to defeat the Fadnavis government | Maharashtra Government: फडणवीस सरकार पाडण्यासाठी विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी

Maharashtra Government: फडणवीस सरकार पाडण्यासाठी विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी

Next

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या सरकारला विधानसभेत तोंडघशी पाडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ५० आमदारांचा पाठिंबा मिळविला आहे, तर काँग्रेस आणि शिवसेनेने आमदार सुरक्षित ठेवले आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व आणि राष्टÑवादीचे अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. मात्र, या सरकारकडे बहुमत नसल्याचे सिद्ध करण्यासाठी विरोधकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
या तिन्ही पक्षांना सोमवारी कोर्टात शपथपत्र सादर करायचे आहे. आमच्याकडे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ आहे, हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेसच्या ४४, राष्टÑवादी ४८ आणि शिवसेनेच्या ५६ आमदारांच्या सह्यांचे शपथपत्र तयार आहे.

अजित पवार यांच्या बंडाने राष्ट्रवादीत पक्षात मोठी फूट पडेल, असे दिसत असताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व राजकीय कौशल्य पणाला लावत ५४ पैकी ५० आमदारांचा पाठिंबा मिळविला आहे. कोर्टात सोमवारी दाखल करावयाच्या शपथपत्रावर राष्टÑवादीच्या ४८ आमदारांनी सह्या झाल्या आहेत. दौलत दरोडा व नितीन पवार हे दोन आमदार मुंबईबाहेर असले, तरी संपर्कात आहेत, असे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. सध्या अजित पवारांसोबत केवळ तीन आमदार असल्याचे दिसते.

धनंजय मुंडेंनी पक्षनेत्यांसमोर मांडली बाजू
अजित पवारांच्या बंडाचा सगळा कट धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर शिजला. त्यामुळे मुंडे यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यापुढे आपली बाजू मांडली, तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंदद्वार चर्चा करून आपल्यावरील मळभ दूर करण्याचा प्रयत्न केला.

उद्धव यांनी घेतल्या भेटी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी राष्ट्रवादी व काँग्रेस आमदारांच्या भेटी घेऊन आपण सर्वजण सोबत असल्याचा संदेश दिला. आपल्याला ही लढाई केवळ दोन-तीन वर्षांपुरती लढायची नाही, तर बरेच दूरपर्यंत आपल्याला जायचे आहे. मी शब्द पाळणारा नेता आहे, असे त्यांनी आमदारांना सांगितले.

कोणाचा दबाव आहे का?
शरद पवार यांनीदेखील आमदारांना भेटून, तुम्हाला काही अडचणी आहेत का? तुम्हाला कोणी दबाव आणत आहे का? असे विचारले. तेव्हा काहींनी आम्हाला अजित पवार यांचे फोन आले होते, पण आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगितले. तुम्ही कोणीही कोणत्याही दबावाला बळी पडू नका, सरकार आपलेच येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

भाजपकडून आमदार फोडाफोडीचे प्रयत्न, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आरोप 
मुंबई : विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपचे नेते आमच्या आमदारांना नानाप्रकारची आमिषे दाखवून त्यांना फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली असली, तरी त्यांच्याकडे बहुमतासाठी आवश्यक असलेले संख्याबळ नाही. अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्टÑवादी काँग्रेसचे बहुतेक सर्व आमदार परत आले आहेत. त्यामुळे त्यांची सारी मदार आता इतर पक्षातील आमदारांवर आहे.
काँग्रेसने आपले आमदार जे.डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलात ठेवले आहेत, तर शिवसेनेचे आमदार ललित हॉटेल आणि राष्टÑवादी काँग्रेसचे आमदार पवईतील रॅनेसाँ या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. या आमदारांच्या सुरक्षेचा पुरेपूर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या हॉटेलमध्ये साध्या वेशातील पोलीस हेरगिरी करत असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: Strong front of the opposition to defeat the Fadnavis government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.