महाराष्ट्र निवडणूक 2019: जितेंद्र आव्हाडांचा भाजपा, शिवसेनेला सल्ला; मुख्यमंत्रिपदासाठी भन्नाट फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 12:14 PM2019-10-30T12:14:08+5:302019-10-30T12:23:00+5:30
Maharashtra Vidhan Sabha Result: शिवसेना, भाजपामधील चढाओढीवर आव्हाडांचं भाष्य
मुंबई: मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना, भाजपामध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. लोकसभा निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळण्याची आठवण शिवसेनेकडून भाजपाला करून दिली जात आहे. तर मुख्यमंत्रिपदाबद्दल आम्ही कोणताही शब्द शिवसेनेला दिला नव्हता, असा पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा होत आला तरीही सत्ता स्थापनेचं घोडं अडलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा, शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. आव्हाड यांनी दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रिपदासाठी भन्नाट फॉर्म्युलादेखील दिला आहे.
'परिस्थितीची जाणीव नसलेले जेव्हा सत्तेच्या लालसेपोटी, केवळ मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळावी म्हणून एकत्र आले आहेत. दोघांनी खुर्चीचे पाय धरले आहेत. दोन पाय यांनी धरले. दोन त्यांनी धरले.. नुसते ओढताहेत.. हे नाटक महाराष्ट्र पाहतोय.. त्यावरुन यांचं चारित्र्य महाराष्ट्राला कळतंय..,' अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना, भाजपावर केली आहे.
शिवसेना, भाजपाची गाडी सध्या मुख्यमंत्रिपदावर अडकली आहे. त्याबद्दल आव्हाडांनी दोन्ही पक्षांना भन्नाट फॉर्म्युला दिला आहे. 'सोमवारी तुमचा मुख्यमंत्री करा. मंगळवारी त्यांचा करा.. बुधवारी तुमचा करा.. गुरुवारी त्यांचा करा.. शुक्रवारी तुमचा करा.. शनिवारी त्यांचा करा आणि उरलेला रविवार आठवले साहेबांना द्या.. आमचं काही म्हणणं नाही.. तुम्ही सरकार बनवण्याची जबाबदारी घेतली होती.. मात्र तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवत आहात,' अशा शब्दांत आव्हाडांनी महायुतीला टोला लगावला आहे.