"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 04:41 PM2024-11-24T16:41:25+5:302024-11-24T16:46:36+5:30
Dhananjay Munde : महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Maharashtra Election Results 2024 : परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा दारुण पराभव केला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी तब्बल १ लाख ४० हजार २२४ पेक्षा अधिक मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला. धनंजय मुंडे झंझावातापुढे राजेसाहेब देशमुख टिकू शकले नाहीत. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी मिळवलेल्या या यशाचे जोरदार कौतुक होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंडे यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी इतका लीड घेतला, पेट्या कमी पडल्या अशी मिश्किल विधान केलं.
राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले होते. त्यामुळे शरद पवार यांनीही अनेकदा त्यांना लक्ष्य केलं होतं. लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात अजित पवारांच्या पक्षाला मोठा फटका बसला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी शरद पवारांच्या उमेदवाराला पराभूत करुन परतफेड केली आहे. धनंजय मुंडे यांनी राजेसाहेब देशमुख यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
विक्रमी मताधिक्याने विजयी झालेल्यानंतर धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी परळीसह बीड जिल्ह्यातील महायुतीच्या महाविजयाबद्दल अभिनंदन धनंजय मुंडे यांचं अभिनंदन केलं. यावेळी धनंजय मुंडे यांनी फडवीसांना शाल देऊन सत्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांचे काही न ऐकता त्यांच्याच सत्कार केला. 'माझ्या घरी आलात तर माझा नियम चालणार', असं फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना म्हटलं. यावेळी "यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या ग्रेट...." असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, धनंजय मुंडेंनी राजेसाहेब देशमुख यांचा १४०२२४ मतांनी पराभव केला. धनंजय मुंडे यांना १९४८८९ मतं मिळाली. तर, राजेसाहेब देशमुख यांना ५४६६५ मतं मिळाली. धनंजय मुंडे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर निवडून आणलं.