ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 08:50 PM2024-11-23T20:50:36+5:302024-11-23T20:51:21+5:30
Maharashtra Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे.
Maharashtra Election Results 2024: असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIM ने महाराष्ट्रात आपले खाते उघडले आहे. मालेगाव मध्य मतदारसंघातून पक्षाने निवडणूक जिंकली असून, AIMIM च्या मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय सेक्युलर लार्जेस्ट असेंबली महाराष्ट्राचे आसिफ शेख रशीद यांचा अवघ्या 75 मतांनी पराभव केला आहे.
मालेगाव मध्य मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे निहाल अहमद तिसऱ्या तर काँग्रेसचे इजाज बेग अजीज बेग चौथ्या स्थानावर आहेत. येथे नऊ उमेदवारांना NOTA पेक्षा कमी मते मिळाली. या जागेवर NOTA च्या बाजूने 1089 मते पडली. 2019 च्या निवडणुकीतही एआयएमआयएमला मालेगाव मध्य मतदारसंघात यश मिळाले होते. 2019 मध्ये मालेगाव मध्य मतदारसंघातून मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीके यांनी निवडणूक जिंकली होती. यावेळी एआयएमआयएमने उमेदवार बदलला आणि त्याचा फायदाही झाला.
ओवेसींच्या पक्षातील हे दोन मोठे नेते पराभूत झाले
ओवेसी यांच्या पक्षाने महाराष्ट्रात 14 उमेदवार उभे केले होते. यामध्ये माजी आमदार वारिस पठाण आणि औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून माजी खासदार इम्तियाज जलील यांचा पराभव झाला आहे. भाजपच्या अतुल सावे यांनी अवघ्या 1177 मतांनी जलील यांचा पराभव केला. तर, भिवंडी मतदारसंघातून वारिस पठाण पाचव्या स्थानावर आहेत. त्यांना केवळ 15800 मते मिळाली. येथील विजयी उमेदवार भाजपचे महेश प्रभाकर चौगुले यांना 70172 मते मिळाली आहेत.
महाराष्ट्रात महायुतीचा मोठा विजय
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वात मोठा विजय मिळाला आहे. भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाने 235+ जागा मिळवत महाराष्ट्राची सत्ता काबीज केली आहे. विजयाचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीचा तर अक्षरशः सुपडा साफ झाला आहे. मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाही.