पवारांच्या गुगलीने शिवसेना आमदारांची चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 10:45 AM2019-11-19T10:45:23+5:302019-11-19T10:47:59+5:30
विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदारांना पुन्हा सत्तेत बसण्याची अपेक्षा लागली होती.
मुंबई : सोमवारी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात जवळपास ४५ मिनिटे बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत सरकार बनविण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नाही. ही काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत बैठक होती. त्यामुळे इतर कोणत्याही पक्षाबाबत बैठकीत चर्चाच झाली नाही असं सांगत शरद पवारांनी शिवसेनेला पुन्हा गॅसवर ठेवलं आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत युतीत एकत्र लढणारे भाजप-शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरून वेगेळे झाले. त्यांनतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठींब्याने शिवसेना सत्ता स्थापन करणार असल्याचे दावे या तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत होते. विशेष म्हणजे यासाठी या पक्षातील नेत्यांची बैठकांवर-बैठका सुरु होत्या.त्यामुळे आपण सत्तेत येणार असल्याचे या तिन्ही पक्षातील नवनिर्वाचित आमदारांना वाटत होते.
मात्र सोमवारी घडलेल्या राजकीय घडामोडींनी या सर्व अंदाजावर पाणी फेरले. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर पवारांनी पत्रकार परिषद घेत सरकार बनविण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. भाजपने काय करावं हा त्यांचा निर्णय आहे. आमच्याकडे सहा महिने वेळ आहे. शिवसेनेसोबत जाण्याची चर्चा सोनिया गांधी यांच्यासोबत झाली नाही. बैठकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सोबत निवडणूक लढलेल्या मित्रपक्षांसोबतची चर्चा झाली, असं पवार म्हणाले.
त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदारांना पुन्हा सत्तेत बसण्याची अपेक्षा लागली होती. तर काही आमदारांनी आपल्यालाला मंत्रीपद मिळणारच असे दावे सुद्धा केले होते. मात्र आता पवारांच्या भुमिकेनंतर भाजप-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांची धाकधूक वाढली असल्याची चर्चा आहे.