Maharashtra Election: महाराष्ट्रात जिथे कमी पाऊस पडतो, तिथे...; राज्यातील निवडणुकांबाबत SCचे महत्त्वपूर्ण निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 03:09 PM2022-05-17T15:09:49+5:302022-05-17T15:21:39+5:30
Maharashtra Election: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या, याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला महत्वाचे निर्देश दिले आहेत.
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयानेनिवडणूक आयोगाला महत्वाचे निर्देश दिले आहेत. राज्यातील निवडणुका कधी घ्यायच्या, याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. 'जिथे जास्त पाऊस पडतो, तिथे मान्सूननंतर निवडणूका आणि जिथे कमी पाऊस पडतो, तिथे निवडणुका घ्यायला काय हरकत आहे?' असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचाराल.
राज्यातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका पावसाळा झाल्यावर घ्याव्यात या संदर्भातील विनंती अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात केला होता. या अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले.
'ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो तिथे मान्सूननंतर पण, जिथे कमी पाऊस पडतो तिथे निवडणुका घ्यायला हरकत काय आहे?' असा प्रश्न कोर्टाने विचारला आहे. जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम तयार करावा असंही कोर्टाने म्हटले. त्यामुळे आता कोकण आणि मुंबईसारख्या भागात मान्सूननंतर निवडणुका होऊ शकतात. तर, मराठवाड्यासारख्या भागात मान्सूनपूर्वीच निवडणुका होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावर आता राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे आहे.