Maharashtra Election2019 : राजमान्य राजश्री राज्याचे कारभारी पहिलवान! पत्रास कारण की...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 04:46 PM2019-10-16T16:46:56+5:302019-10-16T16:50:04+5:30
तुम्ही तेल लावून आखाड्यात उतरल्याचं (तुमच्याकडूनच) अवघ्या महाराष्ट्राला समजलं....
स. न. वि. वि.
पत्रास कारण की , तुम्ही तेल लावून आखाड्यात उतरल्याचं (तुमच्याकडूनच) अवघ्या महाराष्ट्राला समजलं. अन् तुम्हाला समोर कुणी पहिलवानच दिसेना झालाय. तेव्हा म्हटलं तुमच्याकडून काही गोष्टींचा खुलासा घ्यावा अन् तुम्हाला काही गोष्टींचा खुलासा करावा...
१) तुम्हाला तेल लावणारा तुमचा शागीर्द कोण? जळगावचा? नागपूरचा की मुंबईतलाच? की सगळेच या कामात गुंतले होते?
२) तुम्ही अंगाला लावलेलं तेल कोणतं आहे? खोबरेल, बदामाचं, मोहरीचं की सुगंधी (थोड्या वेळाने वास उडून जाणारं)
३) आत्ताच तेल लावल्यावर दिवाळीला अभ्यंगस्नानाला कोणतं तेल लावणार आहात?
४) अंगाला तेल लावून दुसºयाच्या तावडीतून अलगद सुटून जाणं तुमच्यासारख्या नामी पहिलवानाला शोभतं का?
५) तुम्ही आखाड्यात उतरूनही बराच वेळ झालाय. तुम्हाला आव्हान द्यायला कुणी उतरत नसल्यानं तेल जिरून गेलं असेल, नाही तर उडून गेलं असेल. पुन्हा तेल लावणार का?
६) तुम्हालाच आव्हान द्यायला कुणी नाही, तर मग तुमच्या दिल्ली आखाड्यातले दोन दोन उस्ताद राज्यात शड्डू ठोकत का हिंडतायत?
७) या दोन उस्तादांना तेल लावायला तोलामोलाचं कोण शागीर्द जाणार आहे? त्यांना कोणतं तेल आवडतं?
८) हे उस्ताद मोकळ्या असलेल्या आखाड्यात नेमकी कुणाशी कुस्ती खेळणार आहेत?
९) तुम्ही कोणत्या प्रकारची कुस्ती खेळता? मॅटवरची की मातीतली?
१०) तुम्ही तुमच्याच काही नामी पहिलवानांना ‘धोबीपछाड’ दिल्याचं समजलं, खरंय का ते?
११) तुम्ही अंगाला तेल लावलंय, पण तिकडे तुमच्याच काही सहकाºयांना कुस्तीची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे चेहरे ‘एरंडेल तेल प्यायल्या’ सारखे झालेत, हे खरं का?
१२) काही ठिकाणी तुमचे पहिलवान 'नुरा कुस्ती' खेळतायत, खरंय का ते?
१३) आमचे नामी मल्ल तुमच्या आखाड्यात घेतल्यावर तुम्हाला आव्हान द्यायला मुळात येणार कोण?
१४) मुळात तुम्ही आमच्या उस्तादांना त्यांच्या तोलामोलाचे मल्ल वाटत नाही. त्यामुळे त्यांनी तुमच्या आव्हानाकडे दुर्लक्ष केले आहे.
१५) राज्यात ओला आणि सुका दुष्काळ असताना अंगाला असं तेल लावणं तुम्हाला शोभून दिसतं का?
ता. क. : तुमचा तेल लावलेला एक फोटो आम्हाला अवश्य पाठवून देणे. आम्हाला तो पाहण्याची फार उत्सुकता लागून राहिली आहे.
(हसू आवरत नसल्यानं थांबतो.) उत्तराच्या अपेक्षेत.
आपला विश्वासू,
सांगलीकर पहिलवान
(इस्लामपूर आखाडा)
(याला कारभारी पहिलवानांनी दिलेलं पत्रोत्तरही आमच्या हाती लागलंय, ते वाचा उद्याच्या अंकात)
- अभय नरहर जोशी -