प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 05:34 AM2024-11-18T05:34:04+5:302024-11-18T05:34:44+5:30

विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा १५ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने केली. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष जागावाटप आणि उमेदवार निश्चितीत गुंतले होते.

maharashtra elections campaign will Stop today! Candidates, voters now wait for Wednesday | प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सोमवारी संध्याकाळी सहा वाजता होईल. त्यासोबतच गेल्या महिनाभरापासून राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या रूपाने धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा थंडावतील. आता उमेदवारांना आणि मतदारांनाही २० नोव्हेंबर या मतदानाच्या दिवसाची प्रतीक्षा आहे.

विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा १५ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने केली. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष जागावाटप आणि उमेदवार निश्चितीत गुंतले. २२ ते २९ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती, तर ४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. 

त्यानंतर राज्यात खऱ्या अर्थाने प्रचाराची सुरुवात झाली आणि सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले. राज्यातील पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह भाजप आणि काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि इतर राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्रीही राज्यात प्रचाराला आले होते. मागील महिनाभरात प्रचार सभा आणि रोड शो यांनी राज्यातील निवडणूक रण ढवळून निघाले होते.

हे दिग्गज नेते होते प्रचारात

भाजप : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे.

काँग्रेस : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पक्ष सरचिटणीस प्रियांका गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार, हिमाचल प्रदेश, तेलंगणाचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री.

उद्धवसेना : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत.

शिंदेसेना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत.

शरद पवार गट : राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे.

अजित पवार गट : राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे.

निवडणूक आयोगाची कशासाठी मनाई?

सोमवारी संध्याकाळी सहा वाजेनंतर ते मतदान पार पडेपर्यंतच्या कालावधीत टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ, सोशल मीडिया याद्वारे मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या तसेच निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय राजकीय जाहिराती, कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

Web Title: maharashtra elections campaign will Stop today! Candidates, voters now wait for Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.