दक्षिणेकडील राज्यासह महाराष्ट्र तापला; केरळात सर्वाधिक कमाल तापमान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 01:40 AM2020-03-12T01:40:36+5:302020-03-12T01:41:29+5:30
उत्तर-मध्य महाराष्ट्रातील किमान तापमान अद्याप खालीच
मुंबई : देशात १ मार्चपासून मान्सूनपूर्व हंगाम सुरू झाला आहे. परिणामी, देशाच्या दक्षिण आणि मध्य भारतातून तापमानवाढीस सुरुवात झाली असून, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि ओरिसातील कमाल तापमानाने ३५ अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे. विशेषत: केरळ, मुंबई, गोवा आणि कोकणातील तापमानात वाढ नोंदविण्यात येत असून, देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद केरळमधील पुनालूर येथे ३९ अंश झाली आहे. तापमानवाढीच्या शहरांमध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र राज्यातील शहरांचा समावेश होत आहे.
विदर्भात गेल्या २४ तासांत तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. दरम्यान, राज्यभरात हवामानात बदल नोंदविण्यात येत असतानाच, उत्तर मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा खालीच आहे. २४ तासांनंतर यात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
विदर्भाला पावसाचा इशारा
१२ मार्च रोजी मुंबईतील आकाश अंशत: ढगाळ राहील. १३ मार्चला आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९, २० अंशांच्या आसपास राहील. १३ मार्चपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.